मूळचा पुणे येथील रहिवासी असलेला दीपक जाधव हा बोरिवलीत रिक्षा चालवायचा. त्याने एका प्रवाशाला मारहाण केली. प्रवाशाच्या तक्रारीवरून बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दीपक पसार झाला होता. बोरिवली पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो काही सापडत नव्हता. कसून शोध घेतला असता तो येरवडा तुरुंगात असल्याचे समजले.
२०१७मध्ये दीपक याने पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर दीपक खटल्याच्या सुनावणीला हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्याला पुणे पोलिसांनी अटक करून येरवडा तुरुंगामध्ये ठेवले होते. बोरिवली पोलिसांनी आपल्याकडील गुन्ह्यात त्याचा रीतसर ताबा घेऊन मुंबईत आणले होते.
बोरिवली पोलिसांनी बुधवारी दीपकला मुंबईतील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. बोरिवली पोलिसांनी त्याची चौकशी करून याच ठिकाणी असलेल्या लॉकअपमध्ये ठेवले होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास कोठडीच्या दरवाजाच्या खिळ्याला दीपक याने जाडसर दोऱ्याने गळफास लावून घेतल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांनी पाहिले. बेशुद्धावस्थेत असलेल्या दीपकला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.