सूत्रांकडून मिळालेल्या माहितनुसार, आरोपींकडून हिस्लॉप कॉलेजजवळ असलेल्या चिटणवीस सेंटरमधून या दोन्ही व्यावसायिकांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दोघांना गोळ्या झाडून संपविण्यात आले. तळेगाव पोलिसांना एका व्यावसायिकाचा मृतदेह सापडला आहे. खडका गावाजवळ वर्धा नदीच्या काठावर मृतदेह आढळून आला. नागपुरातील सोनेगाव आणि बर्डी पोलिस ठाण्यात व्यापारी बेपत्ता झाल्याचे दोन वेगवेगळे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तपास सुरू असतानाच पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे. ओंकार महेंद्र तलमले (२५, स्मृती लेआउट), हर्ष आनंदीलाल वर्मा (२२, वाडी), दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ (२१, गोधनी), लकी संजय तुरकेल (२२, मरियम नगर), हर्ष सौदागर बागडे (१९ दत्तवाडी)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
अल्पवयीन मुलाने कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला संपविले
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाने कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला संपविले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पहलवान शाह बाबा दर्गाच्या रस्त्याजवळ ही घटना घडली. पहाटे अडीचच्या सुमारास जरीपटका पोलिस ठाण्याचे रात्रीचे गस्त पथक त्या रस्त्यावरून जात असताना एक १७ वर्षीय मुलगा धावताना दिसला. त्याचा पाठोपाठ एक ४० वर्षीय महिला धावत होती. पोलिसांनी महिलेला थांबवून तिला या बाबत विचारले असता, हा तिचा मुलगा असल्याचे तिने सांगितले.
तिच्या मुलाने एका कचरा वेचणाऱ्याला संपविले. पोलीस घटनास्थळी गेले असता शेखर नावाची व्यक्ती मृतावस्थेत आढळली. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन त्याला अटक केली आहे.
किरकोळ वादातून भावाने गतिमंद बहिणीला संपविले
तर, आणखी एका घटनेत घरगुती वादातून भावाने आपल्या मतीमंद बहिणीला संपवले. घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडली आहे. खुशी किरण चौधरी (३८, पडोळे नगर) असे मृत बहिणीचे नाव आहे. तर सूरज लक्ष्मणराव रक्षक (४५) असे आरोपी भावाचे नाव आहे. दोघेही सख्खे बहीण भाऊ आहे. खुशीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र खुशी गतिमंद असल्याने तिचा पती तिला सोडून गेला. तेव्हापासून ती तिच्या भावासोबत राहत होती.
सूरज हा मजूरीचे काम करायचा. काही दिवसांपूर्वी गोंदियामध्ये खुशी ट्रेनमधून खाली पडली आणि तिचे दोन्ही पाय निकामी झाले. तसेच तिच्या पायात प्लास्टर होते. त्यामुळे सूरज तीची पूर्ण सेवा करत होता. तिला वेदना मुळे खूप त्रास होत होता. तीला होणाऱ्या त्रासामुळे ती कळवळायची. ती आधीच मतीमंद होती आणि त्याचे तिचे सर्व काम तिच्या भावाला करावे लागत होते.