गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलेला पाहायला मिळालेला आहे. या पावसामुळे मुंबई सह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. राज्यात ठीक ठिकाणी पावसाने शहरांना झोडपून काढल्यानंतर ठाण्याला पावसाने चांगलेच झोडून काढले आहे. ठाण्यात संध्याकाळ पर्यंत ८८.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यात १.३० ते २.३० या दरम्यान तासाभरात २५ मिमी पावसाची नोंद झाली असून २.३० ते साडे ३.३० या तासाभरात १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ३.३० ते ४.३० या तासाभरात २३.८८ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
२४ तसाच अपघाताच्या ३ घटना…
गुरुवारी २७ जुलै रोजी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे ठाणे महानगर पालिका हद्दीत ३ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सकाळच्या सुमारास घोडबंदर रोड येथे एका तरुणाचा रोड अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. तर ठाण्यातील ओवळा येथील पानखंडा गाव गावात गेलेल्या १९ वर्षीय चिराग जोशी या तरुणाचा २६ जुलै रोजी बंदराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या तरुणाची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु होती. मात्र रात्री या तरुणाचा मृतदेह शोधकार्य थांबवण्यात आले होते. २७ जुलै रोजी सकाळी या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा सुरुवात केली असता सकाळी ८.३०- ९.०० वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह बंदऱ्यातून बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाला यश आले आहे.
त्यातच ठाणे शहर जवळच कळवा येथील मनीषा नगर भागात एक व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांसोबत नाल्यात मासेमारी करण्यासाठी गेला असता या व्यक्तीला पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला पाण्याचा अंदाज न आल्याने तो व्यक्ती वाहून गेला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अनेक अडचणी येत असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.
मुंब्रा दरड कोसळली..
मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपास रोड परिसरात रहिवाश्यामध्ये भीतीदायक वातावरण पसरले असलेले पाहायला मिळालं आहे. मुंब्रा बायपास येथील मुंब्रा देवी मंदिर येथून थोडासा पुढे डोंगराच्या भागात छोटी दरड कोसळली आहे. सदर घटनेत कुठलीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नसली तरी घटनास्थळी वन विभाग कर्मचारी, NDRF पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. सदर ठिकाणी मंदिर आणि मस्जिद असून अनेक कुटुंब राहतात. या ठिकाणच्या रहिवाश्यांना लवकरच सुरक्षित स्थळी हलवणार असल्याचे सांगितले जात आहेत.