• Sat. Sep 21st, 2024

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ आजाराने त्रस्त प्रवाशांना एसटीचा मोफत प्रवास

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ आजाराने त्रस्त प्रवाशांना एसटीचा मोफत प्रवास

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे. या आजाराच्या रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि उपचार घेण्यासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय; तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यासाठी त्यांना नेहमी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. परिणामी रुग्णांचा प्रवासखर्च वाढतो. या पार्श्वभूमीवर या रुग्णांसाठी एसटी महामंडळामार्फत मोफत बससेवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे सुधारित परिपत्रक राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे. मोफत प्रवास योजनेमुळे रुग्णांचा प्रवास खर्च वाचणार आहे. ही योजना लागू केल्याबद्दल आरोग्य विभागाने परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत. राज्यात ‘सिकलसेल नियंत्रण’ कार्यक्रम २००८ पासून २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यात सिकलसेलचे २२,०८२ रुग्ण असून, सिकलसेल वाहकांची संख्या दोन लाख ६१ हजार ६३३ आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
पावसाळी आजारांबरोबरच श्वसनाच्या आजारांत वाढ; ‘दम्या’च्या रुग्णांनी घ्या विशेष काळजी, कारण…
‘सिकलसेल’ म्हणजे काय?

‘सिकलसेल’ हा आनुवांशिक आजार आहे. रक्तात लाल आणि पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. मात्र, ‘सिकलसेल’ रुग्णामध्ये पेशीचा आकार ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी विळ्यासारखा होतो. आई आणि वडील दोघेही ‘सिकलसेल’ग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. हा अत्यंत दुर्धर आणि आनुवांशिक आजार असून, रुग्णाला रक्त देण्याची गरज भसते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed