• Sat. Sep 21st, 2024

Nashik News: ‘त्या’ कर्मचाऱ्याची अखेर उचलबांगडी; ‘सिव्हिल’मध्ये परिचारिकांशी घातली होती हुज्जत

Nashik News: ‘त्या’ कर्मचाऱ्याची अखेर उचलबांगडी; ‘सिव्हिल’मध्ये परिचारिकांशी घातली होती हुज्जत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी परिचारिकांशी हुज्जत घालणाऱ्या कक्ष सेवकावर कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याची मालेगाव सामान्य रुग्णालयात बदली करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी गुरुवारी काढले आहेत.

काय घडलं?

जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारतीमधील पुरुष शल्यचिकित्सा कक्षात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सोमवारी (दि. १७) रात्री पुरुष शल्यचिकित्सा विभागात रुग्णाला उपचार देताना तेथील परिचारिकांनी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मदत मागितली. त्यावेळी ‘मला काम सांगायचे नाही,’ अशी अरेरावी करीत या महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यात आली होती. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिचारिकांनी मंगळवारी (दि. १८) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे केली होती. या प्रकारासह जिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छता निरीक्षकाचे पद अनेक महिने रिक्त असल्याने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर कुणाचेही थेट नियंत्रण नसल्याकडेही ‘मटा’ने बुधवारी (दि. १९) ‘सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिकांना शिवीगाळ’ या शीर्षकाखालील वृत्ताद्वारे लक्ष वेधले होते. त्यानुसार कक्षातील परिचारिकांना शिवीगाळ व दमदाटी होत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी डॉ. थोरातांकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत डॉ. थोरात यांनी संबंधित कक्षसेवक अकबर शेख याची मालेगाव सामान्य रुग्णालयात बदली केली असून, तातडीने तिकडे रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
सुहास कांदे भर बैठकीत भडकल्याने अधिकाऱ्याला आली भोवळ, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काय घडलं?
विशाखा समिती स्थापन

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नव्याने विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये १४ जणांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी अश्विनी सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करणार आहे. अधिसेविका शुभांगी वाघ उपाध्यक्षा म्हणून, तर परिसेविका सीमा टाकळकर कार्याध्यक्षा म्हणून काम पाहणार आहेत. स्वाती चव्हाण (समुपदेशक), अॅड. सुवर्णा शेपाळ (कायदेशीर सल्लागार), तृप्ती काळे (सचिव), ऋतुजा जगताप (उपसचिव), डॉ. रोहन बोरसे, नीता पाटील, ज्योती वाघ, आशालता गोंधळी, उज्ज्वला कराड, संदीप कुईटे, भगवान शिंदे (सदस्य) म्हणून काम पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed