मुंबई, दि. २० : चर्मकार समाजातील व्यक्तींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ काम करते. या महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात चर्मोद्योग विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.
राज्यातील चर्मोद्योगाचा विकास करण्यासाठी सी.एल.आर.आय. चेन्नई येथील चर्मोद्योग क्षेत्रातील संस्थांसोबत बेसलाईन सर्वेक्षण, लेदर क्लस्टर व प्रशिक्षणाचे धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात येत आहे. देवनार येथील दोन एकर जागेवर लेदर पार्क उभारण्यात येणार आहे.
महामंडळामार्फत बी टू बी (B2B), बी टू सी (B2C), ई कॉमर्स पोर्टल (e-commerce portal), योजनांचे ई-पोर्टल (e-portal) आणि लेदर मेलाचे आयोजन करण्यात येत आहे. चर्मकार समाजातील पाच हजार कारागिरांना मशीन किट्स मोफत वाटप करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या चर्मवस्तू व पादत्राणांना बाजारपेठ मिळावी याकरिता कॉन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट, चेन्नई यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात विशेषत: कोल्हापूरी चप्पल जी आय टॅग प्राप्त झाल्याने कोल्हापूरी चप्पलची प्रसार व प्रसिद्धी तसेच स्टॉल लावण्यात येत आहेत. उत्पादन व विक्री केंद्राच्या नूतणीकरणाची कार्यवाही सुरु केली आहे. लिडकॉम व केंद्रीय पादूका प्रशिक्षण केंद्र, आग्रा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सातारा चर्मप्रक्रिया केंद्राचे नूतनीकरण करण्यात येत आहे. परदेशी शिक्षण तसेच चर्मकार समाजातील युवक व युवतींना उद्योगाचे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा विभागीय स्तरांवर पाच एकर जागा खरेदी करुन सेंटर ऑफ एक्सलंस सुरु करण्यात येत आहे.
महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविल्या जात असून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघुव्यवसाय योजना एक लाख रुपये, १.५० लाख व दोन लाख, चर्मोद्योग दोन लाख, लघुऋण वित व महिला समृद्धी प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज देण्यात येते. मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघुव्यवसाय योजना पाच लाख लघुऋण वित्त व महिला समृद्धी योजना १.४० लाख तसेच महिलांकरिता पाच लाखाची नव्याने ‘महिला अधिकारिता’ योजना सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झालेली असून देशात २० लाख व विदेशामध्ये ३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल, तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत २५ हजार उमेदवारांना उद्योजकता प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.
000
शैलजा पाटील/विसंअ/