डोंगरावरील सर्व माती वसाहतीमध्ये घुसली आहे. त्यामुळे इमारतीमध्ये चिखल भरला आहे तर गाड्यादेखील चिखलात अडकल्या आहेत. सिडकोने इथं भूस्खलन होणार नाही याची कुठलीही उपाययोजना केलेली नाही. दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुनर्वसित वरचे ओवले गाव इथे कमरेपर्यंत चिखल रस्त्यावर आला आहे. यामुळे परिसरात जनजीवन विस्कळीत झालं असून यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे.
दरम्यान, रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोळलेल्या ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींपैकी दोन जखमींना कामोठे एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी रुग्णांची नावे प्रवीण डावरे, यशवंत पारधी असे असून दोघांवरती उपचार सुरू असून त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची धडपड सुरू होती. परशुराम निर्गुड यांच्या मामाचे कुटुंब ढिगाऱ्याखाली गेले, तर सुरेश भस्मा याचे सासरे सासू आणि इतर व्यक्ती ढिगाऱ्याखाली सापडले होते.
रात्रीच्या वेळी दरड कोसळल्याची घटना घडताच सुरेश भस्मा हे घटनास्थळी दाखल झाले होते. फोनवरून दरड कोसळल्याची घटना समजली होती. इर्शाळवाडी येथे जाण्यासाठी पाऊल वाट असून जागेवर पोहचायला पायी दीड ते दोन तास लागले. मात्र पोहचल्यावर ‘वाचवा वाचवा’ असा आवाज येताच सोबत असलेल्या पाच ते सहा मित्रांसोबत अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात सुरेश भस्मा आणि परशुराम निर्गुड याचे मामा आणि सासरेदेखील होते. त्यांना रात्री दोन ते तीनच्या सुमारास बाहेर काढले. मात्र, कुटुंबातील २० पेक्षा जास्त व्यक्ती कुठे आहेत, कशा आहेत, याबाबत काहीही माहिती नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.