नेमकं काय घडलं?
हैदराबादला राहणारी योगिता रुमाले ही भिवंडी धामणगाव परिसरात आपल्या माहेरी प्रसुतीसाठी आली होती. तिची लहानगी रिषिका हिच्यावर जन्मापासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ती आपल्या आई-वडिलांकडेच वास्तव्याला होती.
नेहमीप्रमाणे योगिता आपल्या वडिलांसह बुधवारी सकाळी मुलीला घेऊन तपासणीसाठी गेली होती. दुपारी काम आटोपून ती कल्याण-अंबरनाथ लोकलने निघाली. मात्र याचदरम्यान कल्याण पुढील रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला होता. जवळपास तासाभराहून अधिक वेळ लोकल उभी असल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून चालत जाण्याचा पर्याय निवडला.
योगिताही आपल्या वडिलांसोबत रुळांवरुन चालत होती. रिषिकाला आजोबांनी छातीशी कवटाळलं होतं. मात्र पुढे उभी असलेली लोकल नाल्याच्या अगदी जवळ असल्याने बाजूने अरुंद पाइपवरून वाट काढताना आजोबांचा पाय घसरला आणि त्यांच्या हातातील चिमुकली थेट नाल्यात पडली.
लेकीला पाण्यात पडलेली पाहताच योगिताने हंबरडा फोडला. मात्र नाल्याच्या पाण्याचा प्रवाह खूपच जास्त असल्याने ती वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसानी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, चिमुकलीचा शोध लागत नव्हता.
आपला पोटचा गोळा पाण्यात पडल्याचे समजताच योगिता धाय मोकलून रडू लागली. ती सतत नाल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. हा सगळा प्रसंग घडताना पाहून उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. हा व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचं काळीज हेलावलं.
दरम्यान, काल संध्याकाळी बाळ सापडल्याची बातमी पसरली आणि त्याबाबतचे दोन खोटे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे बाळ सापडल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात होता. परंतु हे फोटो ठाकुर्लीतील घटनेचे नसल्याचे उघड झाले असून अद्यापही बाळाचा शोध सुरू आहे.