मिळालेल्या माहितीनुसार, मयत साईनाथ चूनुरकर आणि राहुल आठवले तसेच अन्य एक असे तिघे मित्र बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरालगत असलेल्या आसना नदीत पोहण्यासाठी गेले होते. तिघे जण एकाच वेळी नदी पात्रता उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने साईनाथ चूनुरकर आणि राहुल आठवले हे दोघे जण एका पाठोपाठ बुडाले. तर तिसऱ्याने कसबसा जीव वाचवून तेथून पळ काढला. नदी पात्रता मुले बुडत असल्याचे काही जणांनी पाहिले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जीवरक्षकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. दरम्यान मयतासोबत असलेल्या तिसऱ्या मित्राची माहिती पोलिसांना अद्याप पर्यंत मिळाली नाही आहे. या घटनेने कामठा गावात शोककळा पसरली आहे. काहीशी विश्रांती घेतल्यानंतर नांदेड जिल्ह्यात मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी सकाळपासून रिमझिम स्वरूपात पाऊस सुरू झाला होता. दोन दिवसापासून सर्वदूर झालेल्या या पावसाने शहर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नाले ओसंडून वाहत असून सखल भागात पाणी साचले आहे.
अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. दरम्यान, आसना नदीच्या पात्रातही पाण्याचा प्रवाह वाढला असून पूर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच साईनाथ आणि राहुलला पाण्याचा अंदाज आला नाही. तो पाण्यात बुडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. साईनाथ आणि राहुल हे दोघे चांगले मित्र होते. ते एकमेकांना सोडून कोणतीच गोष्ट करत नव्हते. या दोघांच्याही घरची परिस्थिती बेताची होती. मोलमजूरी करून उपजिवीका करणारे हे कुटुंब आहे. हाताशी आलेल्या तरूण मुलांचा असा अंत झाल्याने दोघांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.