संस्कृती सचिन मिश्रा (वय १६, रा. जगदीशनगर, फ्रेण्डस कॉलनी), असे मृत विद्यार्थिनीचे, तर यश सुनील मिश्रा (वय १६, रा. गोकुल हाऊसिंग सोसायटी, गोरेवाडा), असे जखमीचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे मंगळवारी दोघेही अॅलनमध्ये शिकवणी वर्गाला गेले. सायंकाळी वर्ग आटोपून दोघेही एमएच ३१ एफव्ही ७५५७ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोपेडने घरी जायला निघाले. याचवेळी रविनगर चौकातून वाडीकडे भारत पेट्रोलियमचा एमएच ४०-४२५८ क्रमांकाचा टँकर जात होता. मोपेड मागे होती. अचानक खड्ड्यातून मोपेड उसळली. त्यामुळे मोपेडला टँकरचा कट लागला. यामुळे यशचे मोपेडवरील नियंत्रण सुटले. यामुळे खाली पडून संस्कृती ही ट्रकच्या मागील चाकाखाली आली तर यश हा दुसऱ्या बाजूने पडल्याने जखमी झाला. चाकाखाली डोके आल्याने संस्कृतीचा जागीचा मृत्यू झाला. या अपताताने परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तत्पूर्वी अपघातानंतर चालक टँकरसह पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याण, वाहतूक शाखेचे निरीक्षक विनोद चौधरी यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून संस्कृतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना हटवून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून टँकर चालकाचा शोध सुरू केला आहे.
जड वाहतुकीमुळे अपघात
अमरावती मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अरुंद रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने नेहमीच या मार्गावर अपघात होतात. यशने हेल्मेट घातल्याने तो बचावला. मात्र, मागील चाकाखाली आल्याने संस्कृतीचा मृत्यू झाला, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
दरम्यान, विद्यार्थिनीच्या मृत्यूने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मंगळवारी सायंकाळी संतप्त नागरिक अमरावती मार्गावर आले. त्यांनी प्रशासनाविरोधात नारेबाजी केली. या परिसरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करीत आपला रोष नोंदविला.