• Sat. Sep 21st, 2024

मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ByMH LIVE NEWS

Jul 18, 2023
मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि.१८ : सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे -:

क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

(१) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे.

(२) वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत.

(३) सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल.

(४) गेल्या दहा वर्षांत किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, असा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

 खेळाडू पुरस्कार

(१) खेळाडूने पुरस्कार वर्षासह पूर्व ५ वर्षांपैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे.

(२) खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कारवर्षालगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ/कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ट तीन वर्षांच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ३१ जुलै २०२३ पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन पश्चिम, धारावी, मुंबई – १७ येथे सादर करावेत. अधिक माहिती http://www.dsomumbaicity.blogspot.com वर उपलब्ध आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी कळवले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed