• Sun. Sep 22nd, 2024

वाशीम-बडनेरा रेल्वे मार्ग सोयीचा पर्याय; मूर्तिजापूरा-मानादरम्यान वाहतूक ठप्प पडल्यानंतर वाढली चर्चा

वाशीम-बडनेरा रेल्वे मार्ग सोयीचा पर्याय; मूर्तिजापूरा-मानादरम्यान वाहतूक ठप्प पडल्यानंतर वाढली चर्चा

सुनील मिसर, वाशीम : मुंबई- हावडा मार्गावरील मूर्तिजापूर-माना रेल्वेस्थानकादरम्यान भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प पडली. नरखेड मार्गे गाड्या वळविण्यात आल्या. दहा तासांचा प्रवास करावा लागला. वाशीम-बडनेरा मार्ग अस्तित्वात असता तर बडनेरा-वाशीम-अकोला-भुसावळ मार्गे या गाड्या वळविता आल्या असत्या, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाच्या निर्मितीची मागणी गेल्या दशकापासून होत आहे. रेल्वे अर्थसंकल्पात २००८-०९मध्ये या मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी दिली गेली. सर्वेक्षण विभागाने या रेल्वे मार्गाचा अहवाल १६ जून २०१० रोजी रेल्वे बोर्डाला सादर केला. अहवालात काही त्रुटी निघाल्यामुळे विषय रखडला. मोदी सरकारने मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी धोरण निश्चित केले. राज्यातील वाशीमसह चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. नियोजनबद्ध विकासात्मक कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नव्याने मंजुरात दिली. मध्य रेल्वेने २०१६-१७मध्ये या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ समितीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी खासदार रामदास तडस, कृपाल तुमाने, दुर्गादास उईके, सुरेश धानोरकर, रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, डी. के. सिंग, मनजित सिंग, मनोज शर्मा, मंडळ रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. नरखेड-बडनेरा-वाशीम या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम कुठल्याही त्रुटीविना पूर्ण झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्यक्षात मार्गाची अजूनही प्रतीक्षा आहे.

रेल्वे मार्गाविषयी…

– बडनेरा-वाशीम हा १०८ किलोमीटरचा रेल्वे मार्ग.
– ७७३ हेक्टर शेतजमिनीची आवश्यकता राहणार.
– या मार्गावर नऊ मोठे पूल, ११६ लहान पूल बांधणार.
– रेल्वेमार्ग १५ पुलांवरून व २३ पुलांखालून जाईल.
– नऊ रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जाईल.

दिल्ली-बेंगळुरुसाठी तिसरा पर्याय

बडनेरा-वाशीम या रेल्वे मार्गामुळे दिल्लीवरून बेंगळुरुला जाण्यासाठी सध्या नवी दिल्ली, इटारसी, खंडवा, भुसावळ, दौंड, मीरज, वेल्लोर, बंगळुरू असा एक मार्ग आहे. तर नवी दिल्ली, इटारसी, आमला, नागपूर, बल्लारशा, विजयवाडा, तिरुपती, बेंगळुरु हा दुसरा मार्ग आहे. या दोन्ही मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून नवी दिल्ली, इटारसी, नरखेड, बडनेरा, वाशीम, हिंगोली, लातूर, वाडी, गुंटूर, बेंगळुरू हा तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे दिल्ली-बेंगळुरू हे अंतर ६३५ किलोमीटरने कमी होईल. प्रवाशांचा आठ तासांचा वेळ वाचणार आहे. तर नांदेड- अमृतसरदरम्यानचे अंतर ३२५ किलोमीटरने कमी होऊन चार तासांची बचत होणार आहे. रेल्वेची वीज व डिझेल वाचविणारा तिसरा हा पर्यायी मार्ग आहे.
ना स्पेशल ट्रेन, ना फेऱ्या अधिक; तरीही उत्पन्नात महाराष्ट्रातल्या या शहराचा डंका, रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा
आजवर काय घडले?

– रेल्वे विकास समितीचे जुगलकिशोर कोठारी, गुरुमुखसिंग गुलाटी यांचे प्रयत्न.
– प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना डॉ. देवीसिंग शेखावत यांचा पुढाकार.
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन प्रकल्प अहवाल बनविला.
– सरकार बदलानंतर प्रश्न रखडला. २०१८मध्ये नव्याने चर्चेला आला.
– रेल्वे विकास समितीने मुद्दा लावून धरल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लक्ष घातले.
– सर्वेक्षणाचे काम पुन्हा सुरू झाले.
– तत्कालीन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी हा प्रश्न मनावर घेतला.
– सर्वेक्षणाचे काम कोणत्याही त्रुटीविना पूर्ण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed