मुंबईतील विलेपार्ले येथून चार मित्रांसह चिंचोटी येथे फिरण्यास आलेल्या सुमित राधेश्याम यादव (वय १८) या तरुणाचा गुरुवारी (ता. १३) धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत शुक्रवारी नालासोपारा येथील सहा जण पर्यटनासाठी चिंचोटी येथे गेले होते. त्यापैकी रोहन राठोड (१९) आणि रवी झा (१८) या दोन तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह नायगाव पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढले.
अन् त्यांनी जीव गमावले..
चिंचोटी धबधबा येथे पर्यटनासाठी नालासोपारा येथून सहा तरुण मित्र आले होते. हे सर्व मित्र पाऊस व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी धबधब्यात उतरले, मात्र यातील दोन जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. त्यानंतर या घटनेची माहिती नायगाव पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान व नायगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल शोध मोहीम हाती घेण्यात आली आणि दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.
मुंबईतील विलेपार्ले येथील चार मित्र गुरुवारी दुपारच्या सुमारास चिंचोटी येथील धबधब्यावर पर्यटनासाठी आले होते. हे सर्व मित्र धबधब्या खाली असलेल्या नदीत पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण पाण्यात बुडाला. स्थानिकांनी पाण्यात बुडत असलेल्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही आणि पाण्यात बुडून अठरा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. सुमित राधेश्याम यादव (वय १८ ) असे मृत तरुणाचे नाव आहे याप्रकरणी देखील नायगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.