• Sat. Sep 21st, 2024

पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते

पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती मिळवली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असतानाही अजित पवारांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहेत. याशिवाय अजित पवार गटाकडे सहकार, कृषि, अन्न आणि नागरी पुरवठा यांच्यासारखी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.

२०१९ मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं. पण मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांचं फिस्कटलं. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं निश्चित झालं. मात्र अजित पवारांनी बंड करत पहाटेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र दोघांचं सरकार अवघे काही तास टिकलं. अजित पवार माघारी फिरले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.
सत्तार, राठोडांचं डिमोशन, भुसेंकडे दमदार खातं; पण भुजबळांसोबतच्या डीलने ‘पालकत्व’ जाणार?
अजित पवारांच्या बंडात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचं बोललं गेलं. अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुंडे काही तास नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांना संशय होता. याची किंमत मुंडेंना महाविकास आघाडी सरकारमध्ये चुकवावी लागली. अजित पवारांना साथ देत मुंडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा डाव फिस्कटवला. त्यामुळे मविआ सरकारमध्ये मुंडेंकडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपदं देण्यात आलं.

मविआ सरकारमध्ये मुंडेंवर झालेला खातेरुपी अन्याय अजित पवारांनी दूर केला आहे. त्यांच्याकडे कृषि मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेलं कृषि मंत्रालय मुंडेंकडे सोपवण्यात आलं आहे. अजित पवारांना साथ देत शरद पवारांचा रोष ओढवून घेणाऱ्या, दुय्यम खात्यावर बोळवण झालेल्या मुंडेंना आता अजित पवारांनी कृषिसारखं महत्त्वाचं खातं दिलं आहे.
त्रिशुळ सरकारमध्ये २६ मंत्री, दादांच्या एन्ट्रीने अनेक फेरबदल, कुणाकडे कोणतं खातं, वाचा संपूर्ण लिस्ट
अजित पवारांनी समर्थक आमदारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांचा त्याला विरोध होता आणि आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी शक्तिप्रदर्शन झालं. अजित पवार गटाच्या मेळाव्यात महत्त्वाच्या नेत्यांची, मंत्र्यांची भाषणं झाली. त्यावेळी मुंडेंनी थेट शरद पवारांच्या विरोधात सूर लावला. अजितदादांवर खूप अन्याय झाला. त्यांनी तो निमूटपणे सहन केला. आता त्यांनी मन मोकळं करावं, असं म्हणत मुंडेंनी नाव न घेता शरद पवारांवर शरसंधान साधलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed