घरासारख्या स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीची दस्तनोंदणी निबंधक कार्यालयात होत असते. आपले स्वत:चे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या आणि स्वप्नपूर्ती दृष्टिपथात आलेल्या प्रत्येक नागरिकाला आयुष्यात एकदा तरी दुय्य्म निबंधक कार्यालयात जावेच लागते. संबंधित व्यक्ती या कार्यालयात गेल्याशिवाय गृह किंवा तत्सम स्थावर मालमत्ता खरेदीची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा या कार्यालयांशी संपर्क येत असतो. प्रशासनाचे जिल्ह्याचे प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सह दुय्यम निबंधक वर्ग दोन यांचे नाशिक – १ हे कार्यालय आहे. या कार्यालयात मालमत्तांच्या दस्तनोंदणीबरोबरच विवाहनोंदणी देखील केली जाते. त्यामुळे येथे नागरिकांचा सतत राबता असतो. परंतु, पहिल्यांदा काम घेऊन येणाऱ्या नागरिकाला हे कार्यालय सहजासहजी सापडतच नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी कार्यालय, लेखा कोशागार विभाग, जिल्हा नियोजन कार्यालय, उपविभागीय अधिकारी नाशिक आणि इगतपुरी यांचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय आहे. परंतु, या सर्व कार्यालयांच्या तुलनेत सह दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला अगदीच कोपऱ्यात आहे. या कार्यालयाची इमारत जुनी झाली असून, आत प्रवेशासाठी अरुंद वाट आहे. पावसाळ्यात तर कार्यालयापर्यंत पोहोचणे अधिक खडतर होते. वाटेत मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने यातून वाट काढत जाणे मुश्किल ठरते.
कार्यालयाने दिले १२१ कोटींचे उत्पन्न
सह दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक एक येथे दस्तनोंदणी आणि विवाह नोंदणीसाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळे वर्षाकाठी होणाऱ्या व्यवहारांची रक्कमदेखील कोट्यवधींच्या घरात जाते. यातून सरकारलाही मोठा महसूल मिळतो. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत या कार्यालयात ११ हजार ३७४ दस्तांची नोंदणी झाली. यातून १२० कोटी ८१ लाख ६३ हजार ४७२ रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
– सरकारला बक्कळ आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे हे कार्यालय अडगळीत
– नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नाही
– वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था नाही
– चिखलातून वाट काढत गाठावे लागते कार्यालयात
– कार्यालयात जाण्यासाठीचा मार्ग अरुंद
– कार्यालयाच्या आवारात पाण्याची तळी