• Sat. Sep 21st, 2024

रामराजेंनी साथ सोडली, साताऱ्याच्या तिन्ही राजेंना अजितदादांना बळकटी मिळणार की पवार भरारी घेणार?

रामराजेंनी साथ सोडली, साताऱ्याच्या तिन्ही राजेंना अजितदादांना बळकटी मिळणार की पवार भरारी घेणार?

सातारा…. राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला… २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी भर पावसातली शरद पवारांची सभा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात लिहली गेलीये… धो धो कोसळलेला पाऊस, स्टेजवरून ना शरद पवार हलले ना समोर उभे असलेले हजारो प्रेक्षक… पवारांना ऐकताना पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या… मात्र या क्षणाची आता पुन्हा एकदा आठवण करुन द्यावी लागलीये ती पक्षात पडलेल्या फुटीमुळे… तसं भाजपने सातारची तटबंदी खिळखिळी करण्यास सुरुवात आधीपासून केली होती. पण आता राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर साताऱ्याच्या बालेकिल्लाला तडा बसलाय. रामराजे नाईक निंबाळकरांनी पवारांचा हात सोडल्याने राष्ट्रवादीला कसं खिंडार पडलंय? आणि पक्षफुटीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण नेमकं काय आहे ते जाणून घ्या…

आजपर्यंत अजित पवार आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं फारसं पटत नव्हतं. रामराजे शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत होते. मात्र बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये रामराजे अजितदादांसोबत गेले आणि जिल्ह्याला हादरा बसला.

> साताऱ्यात राष्ट्रवादीचे विधानसभेचे तीन, विधान परिषदेचे दोन आमदार तर एक खासदार आहेत.
> रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटण मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण अजितदादांसोबत आहेत.
> वाई-महाबळेश्ववर-खंडाळा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील सद्या द्विदा मनस्थितीत, पण अजितदादांसोबत असल्याची चर्चा
> उत्तर कराड मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे पवारांसोबत
> तर राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील हेदेखील शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत.

साताऱ्याच्या राजकारणावर रामराजेंचं बऱ्यापैकी वर्चस्व असल्याने उत्तर साताऱ्यातील फलटण, खंडाळा, कोरेगाव येथील कार्यकर्त्यांमधील फूट अटळ आहे. रामराजे अनेक मतदार संघावर परिणाम करू शकतात त्यांना विधान परिषदेच्या सभापतीपदाची अपेक्षा आहे.

> साताऱ्याचे तीनही राजे खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे हे पवारांच्या विरोधात
> नव्या घडामोडीमुळे रामराजे, उदयनराजे आणि अजितदादा एकत्र आल्यास उदयनराजेंचा लोकसभेचा मार्ग सुकर होऊ शकतो.
> ते कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या बाळासाहेब पाटील यांनाही अडचणीत आणू शकतात.
> माढा मतदारसंघात रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना खासदार करण्याचे रामराजे यांनी ठरवले आहे.
> तशी तयारी करत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना तुम्ही निवडणुकीला उभे रहा तुम्हाला पाडणारच असे सांगून आव्हान दिलंय
> त्यामुळे नव्या घडामोडीत राष्ट्रवादी आणि भाजप आता कसे जुळवून घेते याकडे लक्ष आहे

साताऱ्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणावर भर असल्याने सर्वांनी एकत्र समन्वय ठेवण्याचा निर्णय घेतला तर तर ठीक राहील अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आणि सातारा जिल्हा बँकेसह अनेक महत्त्वाच्या संस्थांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. दोन गट पडल्याने खरा कस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागणार आहे. साताऱ्यात गावागावांतील कार्यकर्त्यांशी काका-पुतण्याचे व्यक्तिगत संबंध राहिले आहेत. पण पक्षातील पुटीनंतर त्याचा किती परिणाम संघटनेवर होणार हे पुढील काळ ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed