सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अकॅडमीचे (एपीएमए) संस्थापक संचालक आणि प्रसिद्ध प्रसूतिरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अभंग प्रभू यांनी वर्षभरापूर्वी राज दामधर याची आर्थिक परिस्थिती समजून घेत एका अटीवर प्रवेश दिला. ५० हजारांची अनामत रक्कम ठेवायची आणि सचोटीने अभ्यास करून ‘नीट’ परीक्षेत ६०० पेक्षा अधिक गुण मिळवून ती रक्कम परत मिळवायची अशी ती अट होती. राजने डॉ. प्रभूंचा विश्वास सार्थ ठरवत ‘नीट’ परीक्षेत ६०७ गुण मिळवले.
डॉ. प्रभू यांनी ठरल्याप्रमाणे अनामत रकमेचा धनादेश परत करत त्याचे एमबीबीएस अभ्यासक्रमाचे चारही वर्षांचे शुल्क भरण्याचे ठरवले. त्याचा धनादेश त्यांनी शुक्रवारी राज आणि त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. तसेच राज याच्यासह अकॅडमीतील अन्य २० यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजचे वडील गजानन दामधर, आई प्रमिला दामधर, ‘एपीएमए’चे संचालक प्रा. सचिन हळदवणेकर, संचालिका डॉ. हिमानी तपस्वी, समुपदेशिका डॉ. शीतल श्रीगिरी, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. संजय वाघ आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. प्रभू यांनी या वर्षीपासून तीन गरीब व गरजू मुलींना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली.
डॉ. अभंग प्रभू म्हणाले की, “गेल्या २२ वर्षांपासून ‘एपीएमए’ डॉक्टर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. मुंबई, सांगली आणि पुण्यात ‘एपीएमए’ कार्यरत आहे. पुणे शाखेत जवळपास ७५० विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेसाठी मार्गदर्शन घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरकी करणारे, तसेच तज्ज्ञ शिक्षक येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. एमबीबीएसला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण ही ‘एपीएमए’ची खासियत आहे. राज यांच्याप्रमाणेच गरीब व गरजू मुलींना प्रोत्साहन व आधार देण्यासाठी यंदा तीन मुलींच्या एमबीबीएसची फी ‘एपीएमए’ भरणार आहे.
राज रामधर याने डॉ. अभंग प्रभू व इतर शिक्षकांचे आभार मानले. राज म्हणाला, “माझे मुळगाव बुलढाण्यातील संग्रामपूर आहे. वडिलांचे बीएस्सी, तर आईचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोठ्या भावाने डीफार्मसी केले आहे. मात्र, त्याला नोकरी नाही. सध्या पुण्यात आंबेगाव पठार येथे राहत असून, वडील गेल्या २५ वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत. आई खासगी अंगणवाडीत सेविका आहे.
गेल्या वर्षी आर्थिक परिस्थितीमुळे गावी क्लासेस लावले व मेहनत केली. पण थोडक्या मार्कांवरून एमबीबीएस हुकले. ‘नीट’ परीक्षा पुन्हा देण्यासाठी व तयारीसाठी ‘एपीएमए’कडे आलो. इथली फी माझ्या आवाक्याबाहेर होती. त्यावेळी डॉ. प्रभू सरांना माझी आर्थिक परिस्थिती सांगितली. सरांनी माणुसकीच्या जाणिवेतून मला सहकार्य केले. फी न भरता मला वर्षभर क्लासेस करता आले. उत्तम मार्गदर्शन आणि अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर मला ६०७ गुण मिळाले. एमबीबीएसच्या खर्चासाठी ‘एपीएमए’ अर्थसहाय्य करणार आहे, याचा मला खूप आनंद झाला असून, याची जाणीव ठेवून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून डॉक्टर होणार आहे. तसेच सामाजिक जाणिवेतून डॉक्टरकी करण्याचे त्याने आश्वासनही दिले आहे.
डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या की , “डॉक्टर होण्याची जिद्द उराशी बाळगून, मेहनतीने व आम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार चांगला अभ्यास करत वैद्यकीय प्रवेश मिळवणाऱ्या राजची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नैराश्याने ग्रासलेल्या, आई-वडिलांकडून सगळ्या गोष्टी मिळूनही एकाकी झालेल्या मुलांना राजप्रमाणे मेहनतीने यश मिळवायला हवे. अशा शब्दात त्यांनी राजचे कौतुक केले.