• Sat. Sep 21st, 2024
शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ हरिश्चंद्र पाटील मार्गाच्या काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यात आली असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

पालिकेतर्फे दरवर्षी सुमारे दोन हजार कोटींची रस्तेकामे केली जातात. मात्र त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे टीकेची झोड उठत असल्याने पुढील दोन वर्षांत मुंबईतील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कामे अद्याप फार वेगाने सुरू नसली तरी त्या आधी मंजूर झालेली कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. पालिकेत वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेले कंत्राटदार ही कामे करत आहेत. त्यापैकी शिवाजी पार्क येथील काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे.

दादर पश्चिम येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. मात्र फक्त दीड महिन्यांतच या रस्त्यावर भेगा पडल्या होत्या. स्थानिकांच्या तक्रारीनंतर त्या बुजवण्यात आल्या. या कामानंतर पालिकेने हरिश्चंद्र पाटील मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले होते. रस्त्यांच्या निम्म्या भागाचे म्हणजे ‘एमटीएनएल’पर्यंतचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे येथील रहिवाशांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे.

स्वत:ला सरंजाम समजू नका; उच्च न्यायालयाने SRA अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं, काय प्रकरण?
रहिवाशांची दुरुस्तीची मागणी

या रस्त्यावरील मॅनहोलच्या सभोवतालचे बांधकाम खचले होते. याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले असता, कंत्राटदाराने बांधकाम तोडून नव्याने बनवून दिले. मात्र रस्त्यावरील भेगा कायम आहेत. नवीनच बांधकाम असल्याने हा रस्ता हमी कालावधीतील आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून घेण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

गोराईतही रस्त्याची दुर्दशा

बोरिवली आर मध्य विभागातील गोराई-उत्तन रोडवरील जमादारपाडा येथेही नव्याने बनवलेल्या काँक्रिटच्या रस्त्याला भेगा पडल्या असल्याची तकार पालिकेकडे करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच हा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या असल्याचे ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. कंत्राटदार, पालिकेचे अभियंते आणि या भागातील राजकीय नेते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed