विकासनिधीचं असमतोल वाटप हे कारण पुढे करुन अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. त्यात नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल अग्रणी होते. त्यांनीच अजित पवार हे निधी वाटपात अन्याय करत असल्याचं बोलून दाखवलं होतं. आताही अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निधीवाटपावरुन त्यांनी दादांना इशाराच दिलाय.
आशिष जैस्वाल म्हणाले, कोणत्या एका आमदाराला किंवा कोणत्या एका पक्षाला खूप मदत केली-खूप निधी दिला, त्याचवेळी दुसऱ्या भागावर अन्याय होत असेल तर शेवटी सरकार हे कोणत्या एका पक्षाचे राहत नाही. शेवटी सरकार सर्व आमदारांच्या पाठिंब्यावर चालत असते. त्यामुळे निधीवाटप करताना समतोल पद्धतीने केला पाहिजे आणि सर्व पक्षाच्या आमदारांना न्याय दिला पाहिजे.
मागच्या सरकारमध्ये किमान समान कार्यक्रम काही दिवसांसाठी झाला होता. आता या सरकारमध्ये किमान समान कार्यक्रम नाहीये. परंतु या सरकारने निश्चितपणे एक निर्णय घ्यायला पाहिजे. कुठल्याही आमदाराच्या मतदारसंघात ढवळाढवळ आणि हस्तक्षेप असू नये. तालुका स्तरावरच्या आणि जिल्हा स्तरावरील समित्या असतात, त्यात सर्व पक्षाच्या लोकांना फॉर्म्युल्यानुसार संधी मिळाली पाहिजे. जेव्हा एखाद्या माणसावर अन्याय होतो, त्यावेळी अस्वस्थता निर्माण होते. जर निधीची पळवापळवी केली तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशाराही आशिष जैस्वाल यांनी दिलाय.
कोणत्याही आमदाराच्या मतदारसंघावर अन्याय झाला तर तो सहन करु शकत नाही. शेवटी त्याची बांधिलकी ही त्याच्या मतदारांशी असते. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना विनंती आहे की आमदारांची मनं दुखावली जातील किंवा ते अस्वस्थ होतील अशी चूक कुठल्याही लोकांनी करु नये, असंही जैस्वाल म्हणाले.