• Sat. Sep 21st, 2024
बंडानंतर शरद पवारांसोबत गाडीत बसले, चार दिवसात सोडली साथ; वाईचे आमदार मकरंद पाटील दादांच्या गटात

सातारा: रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फुटीनंतर सोमवारी सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या तीनशे कार्यकर्त्यांना घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सातारा जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश झाला आहे.
अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नांदेडमधील १८ भाविकांबाबत मोठी बातमी समोर, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गट पडल्यानंतर साहेब की दादा अशी आमदारांसह कार्यकर्त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती. मकरंद पाटील यांचे पहिल्यापासूनच अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांच्या यादीत नाव होते. पण, शरद पवार यांच्याशी पाटील घराण्याशी असलेली भावनिक जवळकीमुळे त्यांनी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेतो, असे अजित पवारांना निरोप दिला होता. त्यामुळे गेली चार दिवस ते काय निर्णय घेणार याची उत्सुकता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होती.

दरम्यान, कराडला यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी खासदार शरद पवार आले होते. त्यावेळी शिरवळ येथे त्यांनी शरद पवारांचे स्वागत करून ते येथूनच त्यांच्या गाडीत बसून आले. दौऱ्यात ते शरद पवारांच्या सोबतच दिवसभर होते. त्यानंतर गेले चार दिवस वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांनीच किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी मकरंद पाटलांनी अजित पवारांसोबत जावे, असा सूर निघाला. या बैठकीत कार्यकर्त्यांनी अजित दादांकडे आमदार मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी आग्रही मागणी केली.

संधी मिळत नाही म्हणून अजितदादांसारखा निर्णय घ्यावा लागतो, शिंदेंकडून कौतुक, फडणवीसही हसले!

शरद पवारांवर आमचे सगळ्यांचे प्रेम आहे. भावनिकदृष्टया त्यांच्याबरोबर राहणे योग्य वाटते. परंतु, शेतकऱ्यांच्या हितासाठी, किसन वीर आणि खंडाळा साखर कारखाना सुरळीत सुरू राहण्यासाठी, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी अजित पवार यांच्यासमवेत सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मदत केल्याशिवाय किसन आणि खंडाळा कारखाने अडचणीत बाहेर पडू शकत नाही. या कारखान्यांवर सुमारे हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हे दोन्ही साखर कारखाने कर्जाच्या खाईत बाहेर निघण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांनी अजित पवारांसोबतच जावे, अशी कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली.
सुप्रिया सुळेंकडून फ्रंटसीट, बसलेल्या नेत्याला उठवून पवारांकडून जागा, कोल्हेंचं महत्व वाढलं
मकरंद पाटील व्दिधा मनस्थितीत होते. आजच ते जिल्हा बॅंकेच्या संचालकांसोबत युरोपच्या पंधरा दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. पण, दुपारीच वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी दादांसोबत असल्याचे जाहीर केले. यावेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर अजित पवार आणि मकरंद पाटील यांची सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा केली. यावेळी महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुक्यातील सुमारे अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed