या अपघातात सुमित्रा पिंटू पावरा (वय ३५) आणि त्यांची मुलगी नंदिनी (वय १२) या दोघीही जखमी झाल्याने त्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर त्यांचा मुलगा पंकज (वय ७) हा मृत झालाय. दुसरे पालक गुरी सुरसिंग पावरा (वय २८) हे मयत झाले असून, त्यांची मुलगी गीता पावरा (वय १३) जखमी झाली आहे. अजय तेरसिंग पावरा (वय १९) हा आपल्या भावडांना धुळे येथे शाळेत सोडायला जात असताना जखमी झाला तर त्याचा भाऊ अर्जुन (वय १२) हा देखील जखमी झाला. हे दोघेही धुळ्यात उपचार घेत आहेत. तर त्यांची बहीण निर्मला (वय १५) या अपघातात मयत झाली आहे. संजय जयमल पावरा (वय २८) हे देखील मुलांना शाळेत घेऊन जात होते. या अपघातात त्यांच्यावर आणि त्यांचा मुलगा रितेश (वय १३) या दोघांवरही काळाने घाला घातला तर मुलगी बबिता गंभीर जखमी झाली आहे.
या अपघातानंतर संपूर्ण गाव शोकसागरात असून, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी एकीकडे स्वयंसेवी संस्था पोहोचत असताना दुसरीकडे पं. स. व जि. प. सदस्य वगळता कोणतेही राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी या पीडितांकडे फिरकलेही नाहीत. मंगळवारी घटनेनंतर सायंकाळी उशिरा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच शहरातील खासगी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच शासनाकडून त्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासीत केले. यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील यांनीही जखमी रुग्णांची विचारपूस करून नातेवाईकांकडून माहिती घेतली. मात्र, कोळश्यापाडा येथील लोकांनी मयतांच्या कुटुंबीयांना केंद्र व राज्य सरकारकडून तत्काळ आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
मानसिक आधाराचीही गरज
पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधाराचीही मोठी गरज असून, पीडित कुटुंबातील सदस्य दु:खाच्या आघातामुळे सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक आधारीचीही गरज निर्माण झाली आहे. पीडित कुटुंबाकडे विम्याच्या दाव्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी येऊन गेले मात्र, पीडितांची मानसिक अवस्था ठीक नसल्याने त्यांना परत पाठविण्यात आले.