• Tue. Nov 26th, 2024

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    ByMH LIVE NEWS

    Jul 4, 2023
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. 4 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

    आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

    कबुलायतदार गावकर पद्धती राज्यात अन्य कोणत्याही ठिकाणी अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ मधील नियम क्र.५२ मधील तरतूद शिथील करण्यात आली आहे. आंबोली येथे ६२९-२४.४१ हेक्टर आर हे क्षेत्र प्रवर्ग १ मधील पात्र कुटुंबांना त्यांच्या घराखालील क्षेत्रासह, शेतजमीन शेतसारा आकारून समप्रमाणात वाटप करण्यात येईल. तसेच प्रवर्ग २ मधील कुटुंबांना घराखालील जास्तीत जास्त १५० चौरस मीटर क्षेत्र शासनाच्या प्रचलित धोरणानुसार वाटप करण्यात येईल. तसेच मौजे गेळे येथे २६०-२५.७० हेक्टर आर क्षेत्र पात्र कुटुंबांना समप्रणात वाटप करण्यात येईल. मौजे आंबोली व गेळे गावात खासगी वने, असा शेरा असलेल्या जमिनीबाबत वन विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर त्या जमिनीचे वाटप करण्यात येईल.

    ०००००

    वर्षा आंधळे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed