• Fri. Nov 29th, 2024

    पुण्यात पावसाळी पर्यटनाला जायचा विचार करताय? थांबा त्यापूर्वी या फोटोंतील गर्दीचा पूर पाहा, काय घडतंय?

    पुण्यात पावसाळी पर्यटनाला जायचा विचार करताय? थांबा त्यापूर्वी या फोटोंतील गर्दीचा पूर पाहा, काय घडतंय?

    पुणे : पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी गडकिल्ल्यांवर हजारोंच्या संख्येने गर्दी केलेल्या हौशी पर्यटकांची धोकादायक वाटांवर झालेली ‘कोंडी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुट्टीच्या दिवशी घनदाट जंगलातील धबधबे, डोंगरदऱ्यांमधील दुर्गम वाटा, गडकिल्ल्यांवर गर्दी करणाऱ्या पर्यटकांची संख्या, तेथील आपत्कालीन व्यवस्था, त्यांच्या सुरक्षेबाबात या वर्षीही प्रशासनाने मौन बाळगले आहे. कागदावर साहसी मोहिमांवरील बंधनांचे इमले बांधणाऱ्या प्रशासनाने पाच वर्षांत प्रत्यक्षात पावसाळी पर्यटनावर कोणताही ठोस भूमिका घेतलेली नाही.

    आठवडाभर पडलेल्या पावसामुळे धुक्यात गेलेल्या गडकिल्ल्यांचे फोटो बघता बघता व्हायरल गेले, रविवारी दिवसभरात सिंहगड, लोहगड, राजगड, राजमाचीसह वेगवेगळ्या पावसाळी पर्यटनस्थळी शेकडो पर्यटकांनी गर्दी केली. सिंहगडावर एका दिवसात पंधरा हजार पर्यटक आले होते. दोन दिवसांपूर्वी ज्या चौकात दरड पडली, त्या धोकादायक ठिकाणी दिवसभर पर्यटक घुटमळत होते. गडाच्या घाटमाथ्यावर चार किलोमीटर अंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोहगडावर गेलेले पर्यटक चार तास गडावर झालेल्या ‘कोंडी’त अडकले होते. राजगड, रायरेश्वर पठारावरही शेकडो पर्यटकांनी गर्दी केली होती. भुशी डॅम, ताम्हिणी, मुळशी भागात पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांनी बेशिस्तपणे लावलेल्या गाड्यांमुळे तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. महाबळेश्वर, वेल्हे, मुळशी, पौड भागातील धबधब्याच्या ठिकाणीही पर्यटकांची मोठी गर्दी होती. मात्र, या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोठेही प्रशासनाचे पदाधिकारी बघायला मिळाले नाहीत.

    ‘हा किल्ला वन विभागाच्या हद्दीत येतो’, ‘हा दुर्ग पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली आहे’, ‘ती ग्रामीण पोलिसांची हद्द आहे’ अशी सबब सांगत एकमेकावंर जबाबदारी ढकलणाऱ्या सरकारी विभागांच्या भूमिकेमुळे पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील गड किल्ले आणि जंगलामध्ये पर्यटकांची गर्दी दरवर्षी उच्चांक गाठते आहे. परिणामी हौशी, अतिउत्साहात धाडस करणाऱ्या पर्यटकांच्या अपघातांचे प्रमाणही प्रत्येक पावसाळी हंगामात वाढत आहेत. यात प्राण गमावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पण तिथे प्रशासकीय यंत्रणाच उपलब्ध नसल्याने स्थानिक संघटना, दुर्गप्रेमी आणि गावकऱ्यांच्या मदतीने ही कोंडी सोडवली जाते आहे.

    सगळं काही ‘स्टोरी’साठी

    ब्लॉग, चॅनेल, रिल्ससाठी चांगल्या ‘स्टोरी’ हव्या म्हणून अनेक उत्साही तरुण सध्या गड किल्ल्यांवर पर्यटनासाठी जातात. पावसाळी पर्यटन हा सर्वाधिक लोकप्रियता मिळवून देणारा हंगाम असल्याने त्यांच्याकडे कॅमेरा, ड्रोन, गोप्रो, सेल्फीस्टीक अशी अनेक साधने असतात. गडावर कोठेही फिरून ड्रोनने ही मंडळी शुटिंग करतात. या मंडळींचे फोटो, व्हिडिओ पासून कोणताही पूर्वानुभव नसतानाही सहलीप्रमाणे ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनुभवाशिवाय, प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या अनुपस्थितीत मोहिमा करणाऱ्यांना वाट चुकणे, अपघात अशा समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

    ‘कॅरिंग कपॅसिटी’चे काय ?

    किल्ला असो, जंगल किंवा पठार प्रत्येकाची भौगोलिक रचना, उपलब्ध नैसर्गिक स्रोतांनुसार माणसांना पेलण्याची क्षमता (कॅरिंग कपॅसिटी) असते. क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक गेल्यास तेथील नैसर्गिक साधनांवर ताण येतो. धक्कादायक बाब म्हणजे वन विभाग, पुरातत्व विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ‘कॅरिंग कपॅसिटी’चा विचार केलेला नाही. एका दिवसात किती पर्यटकांनी गडावर, जंगलात गेले पाहिजे याचेही आकडे निश्चित नाही. परिणामी सिंहगड, लोहगड, राजमाची, राजगडासह वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाला क्षमतेच्या काही पटीने अधिक पर्यटक हजेरी लावत असल्याची टीका तज्ज्ञांनी केली आहे.

    या आहेत समस्या

    – गडकिल्ल्यांवरील पर्यटकांना प्रवेशाची संख्या निश्चित नाही
    – जंगलवाटांवर बंदोबस्त, गस्त नसल्याने पर्यटक कुठेही फिरतात
    – बहुतांश ठिकाणी स्वच्छतागृहेच नाहीत, जिथे आहेत ती वर्षानुवर्षे नादुरूस्त
    – बंदी असताना रात्रीच्या सहली, साहसी मोहिमा आयोजित केल्या जातात
    – प्रशासकीय परवानागीशिवाय सशुल्क जंगल कॅम्प, शिबिरे रंगतात
    – किल्ल्यांवर, जंगलावाटांवर स्वच्छतागृहे नाहीत.
    – कचरा व्यवस्थापनासाठी ठोस योजना नाहीत
    – बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते
    पावसाळ्यात फिरण्याचं प्लॅनिंग? ‘या’ ठिकाणी भलतं साहस नको, एक चूक जीवावर बेतू शकते
    लोहगडावर पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दोन वर्षांत खूप वाढली आहे. पुरातत्व विभागाकडून प्रवेश शुल्क घेऊन पर्यटकांना गडावर सोडले जाते. साधारण दोन हजारांपर्यंत पर्यटक गडावर गेले, तर ते व्यवस्थित फिरू शकतात; मात्र गेल्या रविवारी कर्मचाऱ्यांनी सहा हजारांपेक्षा जास्त पर्यटकांना गडावर सोडले होते. त्यामुळे गडावर कोंडी झाली. काही लोक बुरुजांच्या भिंतीवरही चढले होते. लोहगडाबरोबरच इतर किल्ल्यांवर दिवसभरात किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, याचे आकडे निश्चित करण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात, पण गडांवर, पायथ्याला स्वच्छतागृहे नाहीत, प्राथमिक उपचाराचे साहित्यही कर्मचाऱ्यांकडे नसते. गडावर कोणताही अपघात झाल्यास आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध नाही, याचा विचार झाला पाहिजे.- सुनील गायकवाड,शिवदुर्ग मित्र, लोणावळा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed