२०१९ मध्ये घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागात ७ महिला व ११ पुरुष अशा एकूण १७ मृतहेदांचे दान झाले. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षात म्हणजेच २०२० मध्ये कोव्हिडचा फटका बसून २ महिला व ८ पुरुष अशा एकूण १० मृतदेहांचे दान झाले. तशीच परिस्थिती २०२१ मध्ये होती आणि ४ महिला व ८ पुरुष अशा एकूण १२ मृतदेहांचे दान झाले. त्यानंतर मागच्या वर्षी कोव्हिड ओसरल्यानंतर १० महिला व १० पुरुष अशा एकूण २० मृतदेहांचे दान झाल्यामुळे पुन्हा एकदा देहदान वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरत्या वर्षात म्हणजेच २०२३ या वर्षात आतापर्यंत ३ महिला व ४ पुरुष अशा एकूण ७ मृतदेहांचे दान झाले आहे. दरम्यान, कोव्हिड काळात देहदान स्वीकारण्यापूर्वी केली जाणारी आरटी-पीसीआर चाचणी आता केली जात नाही. मात्र, पूर्वीप्रमाणे देहदान करणाऱ्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, ओळखपत्राची सत्यप्रत, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, तसेच सोबत असलेल्या नातेवाईकाच्या ओळखपत्राची सत्यप्रत असणे आवश्यक आहे. देहदान करणाऱ्या संबंधित व्यक्तीने देहदानाचा अर्ज भरलेला असणे आवश्यक नाही, याकडे घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागाने प्रमुख व परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी लक्ष वेधले.
अशा कारणांमुळे स्वीकारता येत नाही देहदान :
मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास, गुप्तरोग, कावीळ ब, बेड सोर्स, क्षयरोग, धर्नुवात, रक्तातील जंतुसंसर्ग असल्यास आणि अपघात झाला असल्यास देहदान स्वीकारता येत नाही. तसेच शवविच्छेदन अहवालानंतरही देहदान स्वीकारता येत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षापासून ते पदव्युत्तरस्तरापर्यंत विविधस्तरीय अभ्यासासाठी मृतदेहांची गरज असते. त्याशिवाय वैद्यकीय अभ्यास होणे अशक्य आहे. कोव्हिडनंतर देहदान वाढत असले तरी घाटीतील प्रत्येक वर्षाला असलेल्या २०० विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात होणारे देहदान कमीच आहे. हे प्रमाण वाढले तर इतर वैद्यकीय महाविद्यालयांना मृतदेह देण्याचा विचार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया घाटी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.