गेल्या अडीच वर्षांत पाच तरुणींची हत्या करण्यात आली आहे, तर एका तरुणीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तरुणींना धमकावण्यासह कोयता, चाकू आणि अन्य धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या १३ घटना आहेत. त्यात एकतर्फी प्रेमातून विवाहितेला १४ दिवस घरात डांबून ठेवल्याची घटना खराडी येथे फेब्रुवारी २०२१मध्ये घडली होती. एप्रिल २०२१मध्ये तरुणी आणि तिच्या मित्राला कोथरूड परिसरात भर रस्त्यात मारहाण केल्याच्या घटनांचा समावेश आहे. बहुतांशी घटना उपनगरात घडल्या आहेत. शहरात कोयता सहज उपलब्ध होत असल्याने गुन्ह्यांमध्ये सर्रासपणे वापर केला जात आहे. चित्रपटांमधील मारहाणीच्या दृश्यातही, विशेषत: दाक्षिणात्य चित्रपटात कोयत्याचा वापर केला जातो. त्यामुळे तरुणाईवर त्याचा प्रभाव असल्याचे दिसून येते.
दुसऱ्याशी लग्न केल्यास जीवे मारणार
तरुणाने प्रेमाची मागणी घातल्यानंतर तरुणीने नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका तरुणीने आधीचे प्रेमसंबंध संपवल्याचे तिच्या प्रियकराला सांगितले. त्यानंतर तरुणीने दुसऱ्या तरुणाशी लग्न केल्यास तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी प्रियकराने दिली होती. चार वर्षे एक तरुण तरुणीचा पाठलाग करत होता. तिने त्याला लग्नास नकार दिला होता. त्या तरुणानेही तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
युवा विचार परिवर्तन
गुन्हेगारी क्षेत्राकडे तरुणांचा वाढता ओढा, प्रेमसंबंधातून होणारे गुन्हे आणि महिला सुरक्षा आदी मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांच्या सूचनेनुसार शहर पोलिसांकडून ‘युवा विचार परिवर्तन’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
एकतर्फी प्रेमातून झालेले खून
– तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या. (मार्च २०२१)
– १४ वर्षीय क्रीडापटू मुलीचा ४७ वार करून खून. बिबवेवाडी येथील घटना. (ऑक्टोबर २०२१)
– श्वेता रानवडे या तरुणीचा औंध येथे खून. आरोपीने नंतर आत्महत्या केली. (नोव्हेंबर २०२२)
– तरुणीच्या पतीचा खून. येरवडा येथील घटना. (ऑगस्ट २०२२)
– खडकी येथे महिलेचा भर रस्त्यात खून. (एप्रिल २०२३)
– लग्नास नकार दिल्याने दर्शना पवार हिचा राजगड येथे खून. (जून २०२३)
एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ला
– एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांवर कोयत्याने वार. (एप्रिल २०२१)
– चंदननगर परिसरात तरुणीवर चाकूने वार. (५ फेब्रुवारी २०२२)
– चंदननगर येथे शाळा सुरू असताना भरलेल्या वर्गात दहावीच्या मुलीवर चाकूने सपासप वार. (मार्च २०२२)
– चाकूच्या धाकाने तरुणीचे अपहरण करून तिला मारहाण करून, चावा घेतल्याची येरवडा येथील घटना. (एप्रिल २०२२)
– प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीवर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याच्या दोन घटना (एप्रिल २०२२)
– प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीवर गुंडांकडून हल्ला, कोयत्याने वार. (डिसेंबर २०२२)
– लोहगाव येथे तरुणीची दुचाकी पेटवली. (एप्रिल २०२३)