अमोल कोल्हे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, ‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुन। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है…पर दिल कभी नहीं,’ असं म्हणत मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच अमोल कोल्हे यांनी यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील एक बोलका व्हिडिओही ट्वीट केला आहे. ‘सगळं विसरायचं, पण बापाला नाही विसरायचं. त्याला भेटल्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपूस केल्याने कणसाळतो, कुंभारतो. त्याला नाही विसरायचं,’ असं अमोल कोल्हे या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.
दरम्यान, साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. खासदार कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी भूमिका बदल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांसोबत नेमके किती आमदार?
अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार आहेत, असं त्यांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी ही संख्या नक्की ३० आहे की त्यापेक्षा अधिक आहेत की कमी आहे, याची चाचपणी घेणे दोन्ही बाजूंनी सुरू आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
‘कोणतीही माहिती न देता कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून सांगण्यात आलं आहे. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बहुसंख्य आमदार, पक्ष कार्यकर्त्यांनी शपथविधीच्या घटनेचा निषेध केला आहे. ज्या काही आमदारांना बोलावून घेतले त्यांनी कोणत्या कागदांवर स्वाक्षरी घेतली, याची माहिती आम्हाला अद्याप समजली नाही. काही आमदारांची दिशाभूल झाली.बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.