अजित पवार, हसन मुश्रीफ आणि प्रफुल पटेल यांच्या विरोधातील ईडीची चौकशी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. धनंजय मुंडे यांच्यासंदर्भातील प्रकरणाच्या चौकशीनं अद्याप वेग घेतलेला नाही. अजित पवार राज्य सहकारी बँक प्रकरण आणि जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी ईडी चौकशीच्या फेऱ्यात होते. काही दिवसांपूर्वी ईडीनं जरंडेश्वर प्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीटमधून अजित पवारांचं नाव वगळण्यात आलं होतं. अजित पवारांना ईडीनं अद्यापर्यंत चौकशीला बोलावलं नव्हतं
हसन मुश्रीफ हे देखील ईडी चौकशीच्या कचाट्यात आहेत. एका साखर कारखान्याच्या शेअर्सचं प्रकरण आणि एका नातेवाईकाच्या २१०० कोटींच्या कर्ज मंजुरीप्रकरणी ते अडचणीत आहेत. हसन मुश्रीफ यांनी आरोप राजकीय दबावापोटी करण्यात आल्याचं म्हटलंय.हसन मुश्रीफ यांना या प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा देत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.
प्रफुल पटेल हे देखील ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. प्रफुल पटेल यांनी अंमली पदार्थाचा तस्कर इकबाल मिर्चीकडून जमीन हस्तांतरण करुन घेतल्या प्रकरणी आणि आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. पटेलांविरोधातील चौकशी देखील महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे.
धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील प्रकरणात फारशी प्रगती दिसून आलेली नाही. बीडमधील १७ एकराचा वादग्रस्त भूखंड अवैधपणे खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर ईडीनं केस दाखल केलेली आहे.
छगन भुजबळ हे देखील ईडीच्या कचाट्यात आहेत. ईडीकडून छगन भुजबळ यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली. २०१६ पासून प्रकरण प्रलंबित होतं. मात्र, एसीबीकडून या प्रकरणातून छगन भुजबळ आणि त्यांच्या निकटवर्तीयांची नावं वगळण्यात आली आहेत. ईडीचं प्रकरण त्यांच्या विरोधात प्रलंबित आहे. पण भुजबळ यांनी त्यांच्या विरोधातील महत्वाच्या प्रकरणाचा निकाल लागल्याचं म्हटलं. भुजबळ यांच्यावर अंधेरीतील आरटीओ कार्यालयाच्या जागेचे प्लॉटिंगचे अधिकार के. एस. चामनकर यांना देताना भूमिका घेतल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर आहे.