अपघाताची माहिती मिळताच भास्कर दरने आणि त्यांचे भाऊ विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरने हे दोघे अपघातस्थळी रवाना झाले. गाडीची सर्व कागदपत्रे आणि गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र परिपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. चालकाने टायरची हवा तपासली होती असा दावा त्यांनी केला आहे.
ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर नातेवाइकांची गर्दी
अपघाताची माहिती मिळताच प्रवाशांच्या नातेवाइकांनी बस स्टँड चौकात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर गर्दी केली. मात्र कार्यालय बंद होते. बाहेर फलकावर लिहिलेले मोबाइल क्रमांक बंद होते. अपघातामध्ये बस जळाल्याने प्रवाशांचे मोबाइलही जळून खाक झाल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे नातेवाइक काळजीत पडले होते. काही वेळाने विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये काम करणारे चेतन घोरफडे व इतर कर्मचारी आले. त्यांनी यवतमाळमधून निखिल पाते, सुजल सोनोने व शशिकांत गजभिये हे तिघे बसल्याचे सांगितले.
