तसेच शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांच्या कारणाचा वेध घेण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पवार यांनी एक शक्यता बोलून दाखविली. त्यांनी म्हटले की, मी समृद्धी महामार्गावरुन काही किलोमीटर प्रवास केला होता. आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा काही खुणा आपल्या डोक्यात असतात. इथे वळण आहे, पुढे झाडं आहेत, अमुक ठिकाणी ही गोष्ट आहे, वगैरे गोष्टी आपल्या डोक्यात असतात. पण समृद्धी महामार्गावरील रस्ता हा सरळ आहे, आजुबाजूला काहीच नाही. या गोष्टीचा परिणाम वाहनचालकांवर होतो की काय, अशी शंका काहींनी बोलून दाखवली. पण मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कमतरता दूर केली पाहिजे. इंडियन रोड काँग्रेसकडून समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यात आल्याचे आणि सर्व मानके पाळण्यात आल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात येते. अपघातासाठी वाहनचालकांची चूक कारणीभूत असल्याचे सांगणे म्हणजे आपली कमतरता दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आता जगातील तज्ज्ञांकडून या महामार्गाची पाहणी केली पाहिजे. काही करुन लोकांचे प्राण वाचले पाहिजेत, असे शरद पवार यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं?
समृध्दी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. शनिवार रात्री १.३० ते २ वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा हद्दीतील पिंपळखुटा शिवारात मुंबई-नागपूर महामार्गावर एका खाजगी बसला अपघात होऊन त्यामध्ये २५ जणांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार सिंदखेड राजा पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा शिवारात मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गावर चॅनल नं ३२३ जवळ यवतमाळवरुन पुणेकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात होऊन आग लागल्याने यामध्ये २५ प्रवाशांचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला आहे.
मृतदेह तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातमध्ये बचावलेल्या आठ प्रवाश्यांवर प्राथमिक उपचार करुन करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर विदर्भ ट्रॅव्हल्सचे चालक व क्लिनर यांना चौकशीसाठी सिंदखेड रा पोस्टे. आणण्यात आले आहे,तर काही प्रवाशांना देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
चालक शेख दानीश शेख इस्माईल (दारव्हा जि. यवतमाळ), क्लिनर संदीप मारोती राठोड (तिवसा), योगेश रामराव गवई (औरंगाबाद), साईनाथ धरमसिंग पवार माहूर, शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा. पांढरकवडा जि. यवतमाळ), पंकज रमेशचंद्र (जिल्हा कांगडा हिमाचल प्रदेश) तर दोन जखमींची नावे कळू शकलेली नाहीत. नातेवाईकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.