• Sat. Sep 21st, 2024

वाचनाची आवड आहे, असं म्हणणाऱ्यांच्या घरी ५ पुस्तकेही सापडत नाहीत- ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार

वाचनाची आवड आहे, असं म्हणणाऱ्यांच्या घरी ५ पुस्तकेही सापडत नाहीत- ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आपल्याला संगीत कळते, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्यांना खरेच ते किती कळते हा प्रश्न आहे. वाचनाची आवड आहे, असे म्हणणाऱ्यांच्या घरी पाच पुस्तकेही सापडत नाहीत. अनेक चित्रकारांची नावेही आपल्याला सांगता येणार नाही. अभिरूचीचे अवमूल्यन झाले आहे’, असे वास्तव मांडत, ‘स्वत:वर संस्कार करून घेण्याची वेळ आली आहे. यासाठी वय महत्त्वाचे नाही, जगात जे चांगले दिसेल ते अवश्य स्वीकारा’, असा सल्ला ज्येष्ठ नाटककर महेश एलकुंचवार यांनी दिला.

विदर्भ साहित्य संघाच्या अमेय सभागृहात प्रसिद्ध छायाचित्रकार सुहास बहुळकर यांच्या ‘कलेतील भारतीयत्वाची चळवळ : द बॉम्बे रिव्हायव्हालिस्ट स्कूल’ आणि ‘नियतीचा विलक्षण खेळ : नगरकर, चिमुलकर, आलमेलकर’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मनीषा पाटील आदी उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर बहुळकर यांनी ‘कलेतील भारतीयत्वाची चळवळ’ विषयावर दृकश्राव्य सादरीकरण केले. कलेतील भारतीयत्व काय आहे, याचा आढावा त्यांनी यातून घेतला. भारतीय चित्रशैलीचे महत्त्व स्पष्ट करणाऱ्या बहुळकर यांच्या पुस्तकांची ओळख मनीषा पाटील यांनी करून दिली.

‘बहुलकर चित्रकारच नाहीत तर आता लेखक म्हणूनही प्रसिद्ध झाले आहेत, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून याची प्रचिती येते, असे एलकुंचवार म्हणाले. लहानपणापासून कलेचे संस्कार होण्याची गरज आहे. शाळांमध्येच असे शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांमध्ये रूची निर्माण होईल, ब्रिटीशकालीन शिक्षणपद्धतीत बदल होण्याची गरज आहे. आई-वडीलच अनभिज्ञ असतात, ते मुलांना कसे सांगणार, संग्रहालय दाखविण्यासाठी किती पालक मुलांना घेऊन जातात, असे सवाल उपस्थित करत सजग पालकांची संख्या वाढण्याची गरज, एलकुंचवार यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रफुल्ल शिलेदार यांनी, तर सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले.

‘चांगले आहे ते स्वीकारा’

‘इतिहास घडविणाऱ्यांची ओळख आपल्याला नाही. यासाठी सरकार सुसंस्कृत हवे. नागरिकांनीही तशी मागणी सरकारकडे करणे गरजेचे आहे. जे चांगेल आहे, ते स्वीकारणे हाच भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे. मी हेच करणार, अशा चौकटीत राहू नका. जगात जे चांगले दिसते त्याची चोरी करा. थोर संस्काराची चोरी करा, मात्र त्यासाठी ताकद लागते’, असे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार म्हणाले.
विठ्ठल-रखुमाई अवतरलेली विहीर प्रति पंढरीत सापडली; ३५० वर्ष जुन्या मंदिराची आख्यायिका काय?
‘आपल्याकडे भारतीय शैलीची कला होती, आक्रमण झाल्यामुळे त्यात बदल होत गेले. याचा सर्वांत जुना पुरावा अजिंठ्याचा आहे. आपल्या देशातील लोकांना येथीलच कलावंत माहीत नसतात, ही एलकुंचवार यांच्या मनातील खंत माझ्याही मनात आहे. ही खंत दूर करण्यासाठीच ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. २०० वर्षांतील महत्त्वाच्या चित्रकारांचा उल्लेख यात करण्यात आला’, असे चित्रकार-लेखक सुहास बहुळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed