हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे. यासोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
पुण्यात कशी असेल स्थिती?
पुढील दोन दिवस पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून, घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार आणि जोराच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. ४ जुलैपर्यंत पाऊस सक्रिय राहणार आहे. शहरात बुधवारी रात्री साडेआठपर्यंत ८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात कमाल २८.१ आणि किमान २२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पावसामुळे हवेत थोडा गारवा जाणवत होता. घाटमाथा आणि धरणक्षेत्रात जोराचा पाऊस पडला. दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा दिला आहे.
राजधानी मुंबईला झोडपलं!
मुंबईला मंगळवारी दिलेल्या ऑरेंज अॅलर्टचा मुहूर्त चुकल्यानंतर बुधवारी मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. उत्तर मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाचा वाढलेला जोर लक्षात घेतल्यानंतर प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई विभागासाठी बुधवारसाठी ऑरेंज अॅलर्ट पुन्हा जारी केला. सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या नऊ तासांमध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर दहिसर येथील स्वयंचलित केंद्रांच्या नोंदीनुसार नऊ तासांमध्ये १५४.५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. डहाणू येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.