कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महाबळेश्वर इथे जाण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला आंबेनळी घाटही धोकादायक झाला आहे. मंगळवारपासून या घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक तात्काळ तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर महाडकडून पुणे इथे जाण्यासाठी जवळचा असलेला वरंद घाटही मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याने या घाटातून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे वरांदा घाटही वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याने हा घाटही बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंबेनळी घाटातील कोसळलेल्या दरडी काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
काय आहेत पर्यायी मार्ग…
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येण्यासाठी सध्या चिपळूण व पाटण, कराड जोडणारा कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी सुरू आहे. पाटण, कराड, सातारा, कोल्हापूरवरून कुंभार्ली घाटातून कोकणात जाता येते. तसेच माणगाव जवळील ताम्हाणी घाट हा मार्गही ही सुरू आहे. ताम्हाणी घाट हा थेट पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व कोकणातील रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा घाट आहे. तसेच रत्नागिरी व कोल्हापूर जोडणारा व काम सुरू आलेला असलेल्या मिऱ्या नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग यावरील आंबा घाट मार्गेही सुरू आहे.
भंडारपुळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर वाहतूक ठप्प
रत्नागिरीत धुवांधार पावसाची बँटींग सुरू आहे. मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गाला पावसाचा फटका बसला असून भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आल्याने दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यासाठी आज बुधवारी आँरेंज अलर्ट देण्यात आला आहे.