म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला एसीबीसी बस स्थानक नसलं तरी चालेल, पण पावसाळ्यात तरी जुन्या सीबीएस थांब्यातून आमची सुटका करा. नवं कोरं बस स्थानक तयार आहे, तर उद्घाटनाची वाट कशाला पाहता? प्रवाशांचे हाल झाले नाहीत तर आशीर्वाद मिळणारच की, पण आमचे हाल करून तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळणार हायं हे सांगायला हवं का?’ असा सणसणीत टोला एसटी प्रवाशांनी सरकारला लगावला आहे.जुने सीबीएस बस स्थानकातील पावसामुळे झालेला चिखल नवं कोरं स्थानक समोर असताना का तुडवायचा? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असेही सवालही एका आजीबार्इंनी उपस्थित केले. विकास नेमका कोणासाठी होत आहे असा प्रश्न पडावा, अशी स्थिती नाशिकमधील विकासकामांची होऊ लागली आहे. प्रश्नांनी भरलेला दिवस उत्तरांशिवायच मावळत असल्याने नाशिककर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. प्रमुख अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा फटका नाशिककर सोसत असतानाच महापालिकेच्या ढिम्म कारभारामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस प्रशासनाला तेवढेच निमित्त मिळाल्याने इतरांकडे बोट दाखवून तेही मोकळे होत असल्याने शहरातील वाहतूक कोंडी फुटेनाशी झाली आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सीबीएस बस स्थानकातील नवीन संकुल बांधून तयार आहे. ते पावसाळ्यापूर्वी कार्यांन्वित होण्याची गरज होती. मात्र, प्रशासन व्यवस्थेच्या शिस्तीला घरघर लागली असून, प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
विरोधी पक्षही हाल पाहण्यात मग्न
प्रवाशांची या चिखलातून सुटका करून समोरच उभारलेल्या नव्या इमारतीत प्रवाशांची सोय करून द्यावी, इतकी साधी कर्तव्यदक्षताही त्यांच्यात उरलेली नाही, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नावापुरत राहिलेले विरोधी पक्षही वर्षानुवर्षे प्रवाशांचे हाल फक्त पाहण्यात मग्न आहेत. जुन्या सीबीएसपासून काही फुटांवरच मनसेचे कार्यालय आहे. कधीकाळी मतदारांसाठी खळ्ळखट्याक करणाऱ्या आणि नाशिकच्या ब्लू प्रिंटचे नकाशे रंगविणाऱ्या मनसेलाही प्रवाशांचे हाल दिसत नाहीत. हीच अवस्था शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची झाल्याने प्रवाशांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे, अशी त्यांची स्थिती झाली आहे.
KCR Pandharpur Visit : राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचे गळे दाबले, म्हणून NCPमधील नेते आमच्या पक्षात येत आहेत- BRS
‘हे हाल आम्ही लक्षात ठेवू!’
नवं असूनही सरकारला जुन्याचीच हौस कशी? प्रवाशांचे हाल दिसत नाहीत का? अशा असंख्य प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या. मत मागायला दारात येणाऱ्यांना प्रवाशांचे हाल दिसत नाहीत का? ‘जुनं सीबीएस तातडीनं नवीन ठिकाणी न हलविल्यास होणारे हाल लक्षात ठेवू,’ अशी संतप्त प्रतिक्रियाही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.