• Mon. Nov 25th, 2024

    सर्व समाज घटकांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा  – कुलपती रमेश बैस

    ByMH LIVE NEWS

    Jun 27, 2023
    सर्व समाज घटकांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा  – कुलपती रमेश बैस

    मुंबई, दि. २७ : सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.

    संतांची व कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात आज हा सोहळा होत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणारे हे विद्यापीठ व बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ‘शिक्षा भूमी’ आहे.

    आजपर्यंत विद्यापीठाचे ६२ दीक्षान्त सोहळे यशस्वी झाले आहेत. या सोहळ्यांना राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, डॉ.एपीजे अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी निरुपम राव, न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली आहे. तर यंदाच्या सोहळ्यास ‘एआयु’च्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांची उपस्थिती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘नॅक’चे ‘अ’मूल्यांकन प्राप्त असे राज्य विद्यापीठ आहे. देशातील सर्वाधिक नेट-सेट-जेआरएफ विद्यार्थी, संशोधकांची संख्या आहे. तसेच बार्टी, सारथी, महाज्योती, राजीव गांधी फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक याच विद्यापीठात आहे.

    शिक्षण घेत असतानाच स्वावलंबन अर्थार्जनासाठी ’कमवा व शिका योजना’ ही वैशिष्ट्यपूर्ण योजना विद्यापीठात सुरु आहे. ‘कोविड’च्या काळात विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले. यामध्ये दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीत दीड कोटींची भर विद्यापीठाने घातली. ‘व्हायरॉलॉजी’ सारखा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु केला आहे. ही समाधानाची बाब आहे.

    तरुणांना स्पर्धेच्या युगात केवळ पदवीच्या आधारे नव्हे तर ज्ञान, कौशल्याच्या बळावर स्वतःचे करिअर घडवावे लागेल भारताला महासत्ता बनविण्याचे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.

    तरुणाईच्या पंखात गगनभरारीचे बळ :  डॉ. मित्तल यांचे प्रतिपादन

    जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेकडे भारताची वेगाने वाटचाल सुरु आहे. तरुणाईचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशातील युवकांच्या पंखांमध्ये गरुड भरारी घेण्याचे बळ आहे, या शब्दात दीक्षान्त सोहळ्याच्या प्रमुख अतिथी डॉ. मित्तल यांनी तरुणांचे कौतुक केले. तरुणांनी विचार आणि कृती याची सांगड घालून परिवर्तन घडविले पाहिजे. शिक्षणाचे ’पॅशन’ असल्याशिवाय तरुण पुढे जाऊ शकणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

    गुणवंतामुळे विद्यापीठाचा नावलौकिक : कुलगुरु

    ‘संशोधन छात्रवृत्ती’सह सर्वच क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिला, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले स्वागतपर भाषणात म्हणाले.  यावेळी ते म्हणाले, विद्यापीठांशी संलग्नित सुमारे ३९४ महाविद्यालयाचे अ‍ॅकडमिक ऑडिट पूर्ण करण्यात आलं आहे हा एक महाराष्ट्रातील उच्चांक होय. ज्या महाविद्यालयांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक पायाभूत सुविधा, प्राचार्य, प्राध्यापक उपलब्ध नाहीत त्यांच्यावर विद्यापीठाने कठोर कारवाई केलेली आहे. शैक्षणिक गुणवत्तेबाबत विद्यापीठ वचनबद्ध आहे. विद्यापीठात व संलग्नित महाविद्यालयांच्या संशोधन केंद्रात आजघडीला पाच हजाराहून अधिक विद्यार्थी संशोधन करीत आहेत. यातील १ हजार ९६५ संशोधकांना बार्टी, सारथी , महाज्योतीसह विविध राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती प्राप्त आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षात अश्वमेध, इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार आदी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये वीसहून अधिक पारितोषिके जिंकली आहेत.   आजच्या दीक्षान्त समारंभात २९१ संशोधकांना पीएच.डी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक मानव्यविद्या शाखेतील १२१जण असून विज्ञान-तंत्रज्ञान -९१, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ४५ तर आंतरविद्या शाखेत ३४ जणांनी पीएच.डी प्राप्त केली आहे. तर एमफिल, पदवी व पदव्युत्तर अशा ५९ हजार ९६६ जणांना पदवी प्रदान करण्यात आली.

    दीक्षान्त समारंभाला भारतीय विद्यापीठ संघटनेच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, प्र-कुलगुरु डॉ श्याम शिरसाठ, कुल‍सचिव डॉ भगवान साखळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ भारती गवळी यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते. दीक्षान्त समारंभात विविध विद्याशाखांमधील 59966 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका व पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते बी. व्हॉक स्टडीज इमारत व पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडींग ॲन्ड बायोडायव्हरसिटी स्टडीज इमारतीचे दूरस्थ माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed