म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रातील महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी भरारी उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून आता महिलांना सफारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिप्सींचे चालक म्हणून प्रशिक्षित केले जात आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. पहिल्या टप्प्यात तीन गावांतील महिलांना संधी देण्यात आली आहे.ताडोब्याच्या बफर क्षेत्रातील विशेषतः कोअर क्षेत्राच्या अगदी जवळच्या गावांतील १८ ते ३५ वयोगटातील युवती व महिलांकरिता चारचाकी वाहनचालक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचे विविध टप्पे राबविले जातील. पहिल्या टप्प्यामध्ये खुटवंडा, घोसरी व सीतारामपेठचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर कोलारा, सातारा, ब्राह्मणगाव, भामडेळी, कोंडेगाव व मोहर्लीला संधी दिली जाईल. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एकूण ८४ अर्ज वनविभागाला प्राप्त झाले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सहभागींना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासोबत लर्निंग व पक्के लायसन्स प्राप्त होईल. या प्रशिक्षणाचा सर्व खर्च ताडोबा-अंधारी व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा रविवारी ताडोबा वनपरिक्षेत्रातील खुटवंडा या गावामध्ये करण्यात आला. प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर व उपसंचालक नंदकिशोर काळे यांच्या पुढाकारातून या नावीण्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (कोरे) महेश खोरे, वनपरिक्षेत्राधिकारी अरुण गोंड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा रविवारी ताडोबा वनपरिक्षेत्रातील खुटवंडा या गावामध्ये करण्यात आला. प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर व उपसंचालक नंदकिशोर काळे यांच्या पुढाकारातून या नावीण्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (कोरे) महेश खोरे, वनपरिक्षेत्राधिकारी अरुण गोंड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
उपक्रमाविषयी…
– या सर्व गावांमध्ये प्रथम महिलांसोबत चर्चासत्र घेण्यात आले.
– त्यांना ‘भरारी’चे महत्त्व व फायदे सविस्तर समजावून सांगण्यात आले.
– दुर्गम भागातील एकूण ६१ महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
– शासकीय-निमशासकीय सेवेमध्येसुद्धा त्यांना या प्रशिक्षणाचा लाभ होईल.
– विविध रिसॉर्टमध्येसुद्धा पर्यटनासाठी वाहनचालक म्हणून या महिला कार्य करणार.
‘नवीन कौशल्य प्राप्त होईल’
‘या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला नवीन कौशल्य प्राप्त होईल. चूल आणि मूल यापलीकडे आम्ही स्वतंत्र आणि स्वतःच्या पायावर उभे राहू. नक्कीच या व्याघ्रप्रकल्पामध्ये जिप्सीचालक व निसर्गतज्ज्ञ म्हणून कार्य करू’, असा विश्वास या उपक्रमातील सहभागींनी व्यक्त केला.