माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विखे पाटील यांच्यावर विविध आरोप केले जात आहे. पूर्वी विखे पाटील यांनी ठाकरे गटातील नेत्यांसह खुद्द ठाकरे यांनाही टर्गेट केले होते. आता ठाकरे यांच्याकडून विखे पाटील टार्गेट होत असताना भाजपमधून कोणीही विखे पाटील यांच्या मदतीला येताना दिसत नाही. उलट अंतर्गत गोष्टी बाहेर जात असल्याचे यामुळे दिसून येते.
दानवे यांनी हे पत्र उघड केल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. यावर स्वत: विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावरून जिल्ह्यात दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून टीका सुरू असून विखे समर्थकांनी मात्र हे पत्र बाहेर पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत यंत्रणेतील कोणी तरी विखे यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत असल्याचीही भावना व्यक्त होत आहे.
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक विखे यांनी प्रतिष्ठेची केली होती. तर भाजपच्याच विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना साथ दिल्याने विखे पाटील गटाचा पराभव झाला. त्यानंतर कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. ही गोष्टही विखे समर्थकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे विखे पाटील यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाऊ लागले आहे.
जिल्ह्यातील नेत्यांकडून जेव्हा विखे पाटील यांच्याबद्दल तक्रारी केल्या जातात, त्यावेळी वरिष्ठ मंडळी ठोस भूमिका न घेता प्रकरण मागे टाकून विसर पाडण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे ती खदखदही कायम राहते. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्या वादात विखे पाटील यांची सक्रिय भूमिका होती. संधी मिळेल तेव्हा विखे पाटील ठाकरे गटातील नेते आणि खुद्द ठाकरे यांच्यावर टीका करीत. प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर विखे पाटील यांनी अनेकदा बोचरी टीका केली. ठाकरे किंवा राऊत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप केल्यावर विखे पाटील त्यांना उत्तर देत. आता ठाकरे गटाकडून विखे पाटील यांना टार्गेट केले असताना भाजपमधून फारसे कोणी पुढे येत नसल्याने विखे यांना एकटे पाडण्याचा डाव तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.
विखे पाटील यांच्या संस्थेला भारतातील वादग्रस्त धर्मगुरु आणि देशद्रोहाचा आरोप असलेला झाकीर नाईकने साडेचार कोटी रुपये दिले, असा आरोप राऊत आणि ठाकरे यांनी केला. यावर स्वत: विखे पाटील यांनी स्पष्टीकरण देत या प्रकरणी पूर्वीच चौकशी होऊन त्यात काही गैर नसल्याचा अहवाल आल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले हे पत्र बाहेर आले आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.