काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. नेहमी शांत असणाऱ्या कोल्हापुरात दंगल उसळली. यामुळे राज्यातच नाही तर देशभरात कोल्हापूर जिल्ह्यातच राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना तडा गेला आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. यामुळे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हजारो कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आणि शिव-शाहू सद्भावना रॅली काढली. ही रॅली कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून सुरू करण्यात आली. रॅली सीपीआर चौक, महानगरपालिका चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी रॅलीच्या पुढे भगवा ध्वज आणि तिरंगा ध्वज होता.
ही रॅली श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यावेळी मालोजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह राजश्री शाहू सलोखा मंचचे वसंत मुळीक, आर के पवार, इंद्रजीत सावंत यांच्यासह आयोजक व आमदार उपस्थित होते. तर रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
‘शंभर वर्षांत कधी लागला नव्हता असा हा लागलेला डाग लवकरात लवकर पुसून काढू’
‘अल्पवयीन असले तरी वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्यांना कदापी माफ करता येणार नाही. कारण त्यांना संस्कार देण्यात त्यांचे पालक कमी पडले. हा प्रकार आणखी कोणी केला आहे का?, स्टेटस ठेवणाऱ्यांना कोणी मार्गदर्शन केले गेले का? याचा अहवाल अजून आलेला नाही. या मुलांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे. बघता-बघता याचा गैरफायदा घेऊन, काही लोकांनी सगळीकडे याबद्दल माहिती पसरवली. संपूर्ण समाजाला, गावाला, शहराला जवळजवळ दोषी धरल्याप्रमाणे वातावरण तयार केले .दुसऱ्या दिवशी जर पोलीस सतर्क राहिले असते तर अशी घटना कदाचित घडली नसती. पण १०० वर्षात कधी लागला नव्हता, असा लागलेला डाग लवकरात लवकर पुसून काढू. यासाठी १०० वर्षे लागणार नाहीत, पुन्हा एकत्र येऊ,’ असा विश्वास यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला.