• Mon. Nov 25th, 2024
    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची वर्णी

    पुणे: साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेल्या ९७ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषेदत ही घोषणा केली.

    तांबे यांच्या अध्यक्षतेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषेदेच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये विविध घटक संस्थांकडून आलेल्या प्रस्तावित नावांवर चर्चा करण्यात आली. त्यातून डॉ. रवींद्र शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, ‘मसाप’ चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांसह विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अमळनेर येथील प्रताप विद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे.
    शिंदे-फडणवीस पायउतार होणार, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बारामतीतून गर्जना
    अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ ही या संमेलनाची आयोजक संस्था आहे. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडीने २ फेब्रुवारीला २०२४ सकाळी ११ वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनातील प्राथमिक कार्यक्रम निश्चित झाले असून संबंधित वक्ते आणि पाहुण्यांशी बोलणी सुरू आहेत. संमेलनाचा समारोप फेब्रुवारी दुपारी ४.०० वाजता कविकट्ट्याने होणार आहे, अशी माहिती प्रा. उषा तांबे यांनी दिली.

    जन्मशताब्दी वर्ष असलेल्या साहित्यिकांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘साहित्यिकांचे शताब्दी स्मरण’ विशेष कार्यक्रम, निमंत्रितांचे कविसंमेलन, ‘खान्देशी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठ साहित्यिकाची मुलाखत, जुन्या पुस्तकावर परिचर्चा, खान्देश साहित्य वैभव चर्चासत्र, विस्मृतीमध्ये जात असलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरण, अभिरूप न्यायालय, गज़ल कट्टा, एक लेखक आणि एक प्रकाशकाचा विशेष सत्कार संमेलनात करण्यात येणार आहे.

    वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री पंढरपुरात; रस्त्यांपासून पाण्यापर्यंत सगळी चौकशी

    वर्धामध्ये झालेल्या ९६ व्या साहित्य संमेलनासाठी राज्य सरकाने दोन कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. संमेलनापूर्वीच काही दिवस निधी संयोजकांपर्यंत पोहोचला होता. या वर्षीच्या संमेलनासाठी आम्ही निमंत्रक संस्थेशी चर्चा करून अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. संमेलनासाठी दोन कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याची माहिती आम्ही राज्याच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत कार्यरत मराठी भाषा विभागाला दिली आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *