आकाश विनोद तिवारी (वय २९, रा. घाटकोपर, मुंबई), रवी रामनाथ वर्मा (वय ३३, रा. चांदीवली), संतोष राममनी मिश्रा (वय ३९, रा. नालासोपारा), मीत हरेश व्यास (वय २६, रा. सुरत), अंकित निहालसिंग टाटेर (वय ३३, रा. विजयनगर, राजस्थान) व अरविंद महावीर शर्मा (वय २४) अशी अटकेतील ठकबाजांची नावे आहेत. अंकितचे कापडाचे दुकान असून व्यास हा शेअर मार्केटिंगचे काम करतो. आकाश व रवीचा मार्बलचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी टास्क देऊन सायबर गुन्हेगारांनी बैरामजी टाउन येथील केमिकल इंजिनीअर घनश्याम गोविंदानी (वय ३२) यांची ५४ लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी फसवणूक व माहिती-तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पार्टटाइम जॉब, टास्क, लाइक व सबस्क्राइब करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आल्याचे सायबर पोलिस स्टेशनमध्ये दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. या सर्वच प्रकरणांचा एकाचवेळी तपास करण्याचे निर्देश चांडक यांनी दिले. सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमित डोळस, साहाय्यक निरीक्षक संदीप बागुल, मारोती शेळके, हेडकॉन्स्टेबल गजानन मोरे, सीमा टेकाम, अजय पवार, योगेश काकड, रविकुमार कुलसंगे, सुशील चंगोले व रोहित मटाले यांनी शोध घेऊन सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून आठ लाखांची रोख, नऊ मोबाइल, १८ डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. त्यांच्या बँक खात्यातील ३७ लाखांची रोख गोठविण्यात आल्याचीही माहिती चांडक यांनी दिली. पत्रपरिषदेला वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमित डोळस उपस्थित होते.
क्रिप्टोद्वारे होतात पैसे जमा
या प्रकरणाचा सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. ठकबाज ओळखीच्या व्यक्तींच्या खात्याचा वापर करतात. त्यांना एक ते २० टक्क्यांपर्यंत आलेल्या पैशातून कमिशन दिले जाते. तसेच बँकेतून एका वेळी ५०-५० लाख रुपये काढण्यात येतात. हवालाद्वारेही रक्कम संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते. व्यास याच्याकडे काही भागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. व्यासने काही दिवसांपूर्वी बायनान्स नावाच्या चीनमधील नागरिकाला क्रिप्टो करन्सीद्वारे २० लाख रुपये वळते केल्याचे चांडक यांनी सांगितले.
अशी होते फसवणूक
टास्क देऊन फसवणूक करणारे सायबर ठकबाज तीन टप्प्यांत काम करतात. पहिल्या टप्प्यात संबंधित व्यक्तीला टास्क दिला जातो. लाइक, रिव्ह्यूचा टास्क देऊन त्याच्या खात्यात पैसे जमा केले जातात. याद्वारे संबंधित व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यात येतो. त्यानंतर जाळे फेकण्यात येते. व्यक्तीला मोठ्या रकमेचे टास्क देण्यात येऊन त्यांना जाळ्यात अडकविण्यात येते. त्यानंतर फसवणूक करण्यात येते. या सर्वांसाठी सायबर गुन्हेगारांच्या विविध टोळ्या काम करतात.