राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे अशोक जीवतोडे आणि मनसेचे रमेश राजूरकर भाजपात प्रवेश करणार आहेत. या दोघांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा झटका बसणार आहे. राजकारणातील चाणक्ष्य अशी ओळख देवेंद्र फडणवीस यांची आहे. राज्यातील राजकारणाला फडणवीस यांनी मोठे हादरे दिले आहेत. एवढेच नाही तर फडणवीस यांनी राज्यातील राजकारणाला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे. एकीकडे टीकांचा मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे फुलांचा वर्षाव फडणवीस यांच्यावर होत आहे.
धक्क्यावर धक्के देणाऱ्या फडणवीस यांनी आता एकाच बाणाने राज्यातील दोन मोठ्या पक्ष प्रमुखांना घायाळ करण्याचा गेम प्लान आखला आहे. उद्या फडणवीस चंद्रपुरात आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय, ओबीसी नेते तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी डॉ. अशोक जीवतोडे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आणि ओबीसी समाजात जीवतोडे यांचा प्रभाव आहे. जीवतोडे कट्टर विदर्भवादी असल्याने सर्वसामान्यांत त्यांची विशेष ओळख आहे. जीवतोडे यांच्या प्रवेशाने भाजपला बळ मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला मोठा झटका बसणार आहे.
दुसरीकडे मनसेचे रमेश राजूरकर यांच्याही उद्या भाजपात प्रवेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये राजूरकर यांची ओळख प्रभावी व्यक्तिमत्व अशी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजूरकर यांनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांना 33 हजारच्या आसपास मते मिळाली होती. राजूरकर यांच्या सोबत वरोरा विधानसभा क्षेत्रातील अनेक सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष, विविध पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. तशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये रमेश राजूरकर यांनी दिली. या दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा झटका बसणार आहे.