• Sat. Sep 21st, 2024

आईनेच कायम त्याग का करावा? ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा सवाल

आईनेच कायम त्याग का करावा? ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आईला आपल्याकडे देवी बनवून सतत त्याग करायला भाग पाडले जाते. तिनेच कायम त्याग का करायचा आणि खस्ता का खायच्या,’ असा सवाल ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी उपस्थित केला. ‘आईला देव न करता तिला मानवच राहू द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.‘यशवंतराव चव्हाण सेंटर’तर्फे आयोजित ‘यशस्विनी सन्मान सोहळा’ गुरुवारी पार पडला. यामध्ये भारती नागेश स्वामी (कृषी), डॉ. सुनीता बोर्डे-खडसे (साहित्य), राजश्री हेमंत पाटील (उद्योग), लक्ष्मी नारायण (सामाजिक), शैलजा जैनेंद्रकुमार जैन (क्रीडा) आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या शर्मिला प्रभाकर कलगुटकर (पत्रकारिता) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अख्तर बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेत्री शबाना आझमी, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे, प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

अख्तर म्हणाले, ‘हल्ली आईच आदरणीय आहे, असे सांगून तिची पूजा केली जाते. आई आदरणीय आहेच; मात्र वडीलही आदरणीय नाहीत का, आईप्रमाणे वडिलांचाही सन्मान झाला पाहिजे. आई बरोबरच मुलगी आणि सून यांनाही महिला म्हणून चांगली वागणूक दिली पाहिजे. आईच्या कष्टाचा सन्मान करणारा मुलगा मोठा झाल्यावर तो पत्नीचाही तेवढाच सन्मान करतो, असे नाही.’

‘आज समाजामध्ये अंधश्रद्धा वाढत असून, त्यामध्ये महिलाच कायम भरडल्या जातात,’ असे सुळे म्हणाल्या. मनाली भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. काकडे यांनी आभार मानले.

संधी मिळाल्यास मुलीही कतृत्त्वाचा वारसा चालवू शकतात

‘मुलींना संधी मिळाली, तर त्याही कर्तृत्त्वाचा वारसा समर्थपणे चालवू शकतात,’ असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘मी संरक्षणमंत्री असताना सैन्यदलात महिला नव्हत्या. लष्कराची नोकरी त्यांना ‘झेपणार नाही’ असे कारण देऊन महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, सैन्यदलात महिलांसाठी आरक्षण दिल्यानंतर सकारात्मक परिणाम झाला आहे. हवाई दलात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.’

लुटनेवाला जायेगा

साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत महिलांचे कर्तृत्व आहे, याकडे शबाना आझमी यांनी लक्ष वेधले. ‘कमानेवाला आयेगा, लुटनेवाला जायेगा, नया जमाना आयेगा’, अशा घोषणा देऊन त्यांनी सभागृहातील महिलांना सहभागी करून घेत वातावरणात रंगत आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed