• Sat. Sep 21st, 2024

पुणे मेट्रोला आणखी महिनाभर विलंब; किमान पावसाळा संपण्यापूर्वी सुरू करण्याची पुणेकरांची मागणी

पुणे मेट्रोला आणखी महिनाभर विलंब; किमान पावसाळा संपण्यापूर्वी सुरू करण्याची पुणेकरांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुढील टप्प्यातील विस्ताराच्या दृष्टीने कामाला विलंब करणाऱ्या ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’चाच धडा ‘मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तां’नी (सीएमआरएस) गिरवला आहे. गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान (सिव्हिल कोर्ट) मेट्रो सुरू करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) तयार असल्या, तरी केवळ ‘सीएमआरएस’च्या अंतिम मान्यतेसाठी ‘महामेट्रो’वर महिन्याहून अधिक काळ प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.’मेट्रो’च्या सध्या कार्यान्वित स्थानकांच्या सुरक्षेवरून निर्माण झालेला वाद, त्यावरून झालेली कोर्टकचेरी, ‘सीओईपी’कडून अहवालात झालेल्या त्रुटी आणि त्याची पंतप्रधान कार्यालयासह ‘सीएमआरएस’पर्यंत झालेल्या तक्रारी, यांमुळे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मान्यता देण्यासाठी ‘सीएमआरएस’कडून ‘महामेट्रो’ची सत्त्वपरीक्षा घेतली जात आहे. कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी ‘सीएमआरएस’ने दोन्ही मार्गांचे डोळ्यात तेल घालून परीक्षण केले.

‘सीएमआरएस’कडून फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट दरम्यानचे सर्व परीक्षण पूर्ण झाले आहे. गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानच्या मार्गिकेची प्राथमिक तपासणी ‘सीएमआरएस’च्या टीमने पूर्ण केली आहे. पुढील काही दिवसांत या मार्गिका आणि स्टेशनच्या अंतिम तपासणीसाठी ‘सीएमआरएस’चे प्रमुख पुण्यात येणार आहेत. त्यांच्या पाहणीनंतरच ‘महामेट्रो’ला पुढील टप्प्यातील सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. अंतिम पाहणीसाठी ‘सीएमआरएस’कडून सातत्याने ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत असल्याने ‘मेट्रो’ किमान पावसाळा संपण्यापूर्वी तरी सुरू होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
आर. आर. आबांचा लेक शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची अवस्था पाहून अस्वस्थ, स्वच्छतेचा प्रश्न मांडला अन् …
अजूनही बहुतांश कामे अपूर्णच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी (सहा मार्च २०२२) मेट्रोचे उद्घाटन झाले; त्या वेळी ठरावीक निकषांची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतर ‘सीएमआरएस’ने सेवा कार्यान्वित करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर, जवळपास सव्वा वर्ष उलटले, तरीही या मार्गिकेवरील काही ठिकाणची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे या वेळी सर्व स्टेशनवर प्रवाशांसाठी किमान एक प्रवेश मार्ग (एंट्री-एक्झिट पॉइंट) व्यवस्थित सुरू असेल, याची खबरदारी घेतली जात आहे. डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान या दोन स्टेशनांवर प्रवाशांसाठी प्रवेश मार्गांच्या कामांवर अंतिम हात सध्या फिरविला जात आहे.

पालकमंत्र्यांच्या सूचनांचा विसर

– एप्रिलअखेरपर्यंत मेट्रोची सर्व कामे पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच दिल्या होत्या.
– तरीही, ही कामे मे आणि जून असे दोन महिने पुढे सुरूच आहेत.
– मेट्रोची पुढील टप्प्यातील सेवा सुरू होण्याबाबत फक्त नवी डेडलाइन दिली जात आहे.
– प्रत्यक्षात मेट्रो सुरू केव्हा होणार, याबाबत कोणालाच काही कल्पना नाही.
– भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्याबाबत पूर्ण अनभिज्ञ आहेत.

मेट्रो आता नागरिकांच्या ‘ट्रोल’वर

‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या जागी डॉ. नितीन करीर यांची नेमणूक झाल्यापासून मेट्रोची सर्व कामे नेमकी केव्हा संपणार, मेट्रो पुणेकरांसाठी केव्हा खुली होणार, याबाबत काहीही जाहीर करण्या आलेले नाही. ‘मेट्रो’च्या फेसबुक आणि ट्विटरवरील ‘पोस्ट’मध्ये मेट्रोच्या अपडेटबद्दल माहिती देण्याऐवजी ‘मेट्रो’त होणारे वाढदिवस, खेळ, सण-समारंभ याचीच अधिक माहिती दिली जाते. त्यामुळे नागरिकांकडून आता मेट्रोला ‘ट्रोल’ केले जात आहे.

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराची गरज

पुणेकरांची मेट्रो कायमच विलंबाने धावणारी असून, ती भविष्यातही तशीच राहणार यासाठी सर्व सत्ताधारी आणि संचलन यंत्रणा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे, असा प्रश्न सध्याचा कारभार पाहिल्यावर पडल्यावाचून राहात नाही. मेट्रोचे काम सुरू होण्यास दहा वर्षे, मग पहिला टप्पा उशिराने कार्यान्वित, त्यानंतर पुढील टप्प्यासाठी एक वर्षांहून अधिक विलंब, मेट्रोच्या विस्तारित मार्गांना अजूनही परवानगीची प्रतीक्षा.. अशी यादी कितीही लांबविता येईल. पुण्याला सध्या खासदार नसल्याने पुणेकरांची बाजू मांडणारे राजकीय नेतृत्वच नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पुण्याला खासदार नसल्याची शिक्षा केंद्र-राज्यातील सत्ताधारी आणखी किती काळ पुणेकरांना देत राहणार? पालकमंत्र्यांनी यात आता ठोस भूमिका घेऊन मेट्रोचे काम केव्हा संपणार आणि ती केव्हा सुरू होणार, हे जाहीर करण्याची गरज आहे.

प्रवासी काय म्हणतात?

मेट्रो सुरू होऊन दीड वर्ष होत आले, तरी अजूनही फक्त गरवारे महाविद्यालयापर्यंतच जाता येते. मी या मार्गाचा नियमित वापर करतो. विशेषत: कडक उन्हात आणि पावसात मेट्रो फायद्याची ठरते. परंतु, विविध कामांसाठी मनपा भवन, पुणे स्टेशनपर्यंत जावे लागते. त्यामुळे किमान पुणे रेल्वे स्थानकापर्यंत मेट्रो लवकर सुरू केल्यास माझ्यासारख्या अनेक प्रवाशांसाठी ती फायद्याची ठरेल. त्यातून प्रवासी संख्याही निश्चित वाढेल.

– अनुज कुडी, पुणे

पिंपरीतील फुगेवाडीपर्यंतच्या मेट्रोचा सध्या काहीच उपयोग होत नाही. पुण्यातील शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्टपर्यंत या सेवेचा विस्तार झाल्यास पिंपरीतून पुण्यात जाणाऱ्या अनेक नागरिकांना फायदा होईल. मात्र मेट्रो प्रशासन आणि राज्यकर्ते फक्त घोषणाबाजीमध्येच अडकले आहेत. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी मेट्रोचा पुढील टप्पा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

– सोमनाथ शेळके, चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed