विशेष म्हणजे एमपीएससी परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवणारी दर्शना पवार ही १२ जून रोजी बेपत्ता झाली होती. राहुलसोबत राजगड किल्ल्यावर जात असल्याचे तिने तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांना सांगितलं होतं. यानंतर १८ जून रोजी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तिचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृतदेहावर अनेक जखमा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दर्शनाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्येही राहुल आणि दर्शना दुचाकीवरून राजगड किल्ल्यावर पोहोचताना दिसले. १२ जून रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास दोघेही दुचाकीवर दिसले. पण सकाळी १०.३० च्या सुमारास दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल एकटाच बाईक चालवताना दिसला. त्यामुळे संशयाची सुई त्याच्यावरच होती.
दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते- एस.पी
एसपी अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना आणि राहुल हे लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे. पदवीनंतर दोघांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात येण्याचं ठरवलं होतं. खरंतर, दोघेही गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे.
एमपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण…
एमपीएससीची परीक्षा दर्शना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिचा राज्यात तिसरा क्रमांक आला होता. यानंतर राज्याच्या वनविभागात वर्ग-१ अधिकारी म्हणून नियुक्तीही झाली होती. पण त्यानंतर तिच्याच मित्राने तिच्या सर्व स्वप्नांची माती केली.
दर्शनाने राहुलपासून दूर जाण्यास सुरुवात केली….
दुसरीकडे, राहुलच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनाची क्लास-१ अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तिने राहुलपासून दूर राहण्यास सुरुवात केली. इतकंच नाहीतर तिने लग्नाचा प्रस्तावही नाकारला होता. यामुळे तो खूप संतापला. म्हणून ट्रॅकिंगच्या बहाण्याने त्याने तिला रायगड किल्ल्यावर नेलं आणि तिथेच तिचा शेवट केला.