माळीबाभुळगाव येथे दीपक गोळक यांचा पोल्ट्रीफार्म असून गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी धम्मपाल सांगडे हा आपली पत्नी, दोन मुली व एका मुलांसमवेत मजुरीसाठी आला आहे. मूळचे नांदेड जिल्ह्यातील करोडी येथील हे कुटुंब पोल्ट्रीफार्मवर राहत होते. सकाळी येथील विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी तो बाहेर काढला. निशीधा सांगडे (वय २) हिचा हा मृतदेह होता. कुटुंबातील इतर सदस्य गायब असल्याने संशय बळावला. त्यामुळे पाणी उपसण्यात आले. त्यानंतर पाठोपाठ कांचन सांगडे (वय ३०), निखिल सांगडे (वय ६) व संचिता सांगडे (वय ४) यांचेही मृतदेह आढळून आले.
आईसह तिच्या तिन्ही मुलांचे मृतदेह आढळून आल्याने तिचा पती धम्मपाल याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यातच ग्रामस्थांकडून माहिती मिळाली की, बुधवारी रात्री धम्मपाल याचे त्याची पत्नी कांचन हिच्याशी वाद झाला होता. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी हा वाद मिटवला. धम्मपाल याला दारूचे व्यसन असल्याचेही सांगण्यात आले. रात्रीच्या वादानंतर आज सकाळी हे मृतदेह आढळून आले.
विहिरीमध्ये जवळपास तीस फूट पाणी असल्याने मोटारीने पाणी उपसण्यात आल्या नंतर सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उद्या सकाळी शविच्छेदन केले जाणार आहे. घटनेची माहिती मिळातच पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, सुरेश बाबर, कृष्णा बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.