चिराग हा रोजच्या प्रमाणे गुरुवारी दुपारी घरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबत खेळत होता. यामध्ये त्याने एका चाकाला कागदाचे तुकडे जोडले आणि जाड सेल (बॅटरी) चाकाला जोडून हवा घेत होता. हे चक्र त्याने चेहऱ्याजवळ ठेवले. काही वेळाने बॅटरी गरम होऊन स्फोट झाला. या स्फोटात त्याच्या डाव्या गालाला गंभीर दुखापत झाली. घटनेच्या वेळी चिरागचे आजोबा आणि भाऊ घरी होते.
याची माहिती मिळताच हितेश बनसोड यांनी त्याला शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे डॉ. मयूर डोंगरे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला नागपूर मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्फोटामुळे चिरागच्या डोक्याला इजा झाली नसली तरी त्याचा डावा कान, घसा आणि मेंदूवर परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्फोट झालेली बॅटरी ही निकृष्ट दर्जाची आणि चिनी बनावटीची होती, असे चिरागच्या वडिलांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबत खेळण्याची सवय
चिराग सावनेर शहरातील सुभाष प्राथमिक शाळेत शिकतो. तो यावर्षी चौथीत गेला. त्याचा एक मोठा भाऊ आहे. जो ११ वर्षांचा आहे. त्याचे वडील शहरातील वॉटर कुलिंग कंपनीत मजूर म्हणून काम करतात आणि त्याची आई गृहिणी आहे. आजोबा रेल्वेत नोकरी करत असल्याने ते रेल्वेच्या क्वार्टरमध्ये राहतात. चिराग आणि त्याच्या मोठ्या भावाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबत खेळण्याची सवय आहे. वारंवार नकार देऊनही त्याने ही सवय सोडली नसल्याचे आजोबांनी सांगितले. या सवयीमुळे चिराग आणि त्याच्या भावाने वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा केल्या.