भूमिगत गटार योजना पूर्णत्वास गेल्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेतली असती तर कोट्यवधीचा खर्च वाचला असता. परंतु, तसे न करता फक्त निधी लाटण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे.
फोडलेल्या रस्त्यांची डागडुजी संबंधित कंत्राटदाराने करणे आवश्यक आहे. परंतु, हे रस्ते व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत. गिट्टी, दगड रस्त्यावर पडून आहे. अनेक दुचाकीचालकांचा या रस्त्यावरून अपघात झाले आहेत. सायकलने जाणारे लहान बालके अडखळतात. ज्येष्ठांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. संपूर्ण रस्त्यावर धुळीचे वातावरण असते. आता पावसाला सुरुवात होणार असल्याने रस्त्यावर चिखल पसरून अपघात वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे. परंतु, याकडे लक्ष देण्यास कंत्राटदार आणि पालिका प्रशासनाला वेळ नाही. फोडलेले रस्ते लवकरच दुरुस्त केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अजूनही दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
पाणीपुरवठा योजनेचे भिजत घोंगडे
भंडारा नगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर सन २०१८मध्ये महत्वाकांक्षी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. ही योजना ५७ कोटींची आहे. या योजनेचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर १८ महिन्यांत योजना पूर्ण होणे बंधनकारक होते. परंतु, आज सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपून प्रशासक बसल्यानंतरही या योजनेचे काम मंदगतीने सुरू आहे. शहरात सध्या भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते फोडणे सुरू आहेत, काही दिवसानंतर पाणीपुरवठा योजनेसाठीही रस्ते फोडले जाणार असल्याचा टोलाही यानिमित्ताने लगावण्यात आला आहे.