युती सरकारमध्ये एकनाथ खडसे मंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून गैरमार्गाने लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. याच्याबाबत एकनाथ खडसे यांनी २०१६ मध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी कालपासून सुरू झाली आहे.
सोमवारी या खटल्याच्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी ना. गुलाबराव पाटील गैरहजर होते. याच दिवशी गुलाबराव पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने ५०० रुपयांचा कॉस्ट भरावयाचे आदेश करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी २१ जून रोजी अर्थात उद्या होणार आहे.
दरम्यान जिल्हा न्यायालयात २०१६ मध्ये दावा दाखल केल्यानंतर त्यावेळी एकनाथ खडसे तसेच गुलाबराव पाटील हे दोघेही हजर न झाल्याने न्यायालयाने हा दावा डिसमीस केला होता. त्यानंतर एकनाथ खडसेंनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावेळी खंडपीठाने एकनाथ खडसे यांना २० हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा खटला जिल्हा न्यायालयात बोर्डावर घेण्याचे आदेश दिले होते. खंडपीठाच्या आदेशानुसार एकनाथ खडसे यांनी १६ जून रोजी २० हजार रुपयांचा दंड भरला आहे.
खडसेंनी हा दंड भरल्यानंतर जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात दाखल दाव्यावरून कामकाज सुरु झाले आहेत. या दाव्यावर आज मंत्री गुलाबराव पाटील हे गैहजर राहिल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश केले आहे. दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाने दंड ठोठावल्याच्या या विषयाने चर्चा रंगू लागल्या आहेत. आता दाव्यावर उद्या २१ जून रोजी कामकाज होणार आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील हे हजर होतात का, या दाव्यावर जिल्हा न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.