• Mon. Nov 25th, 2024

    भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Jun 20, 2023
    भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि. २० :- राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई शहरासह उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    भांडुप येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिक्षणमहर्षी रामचंद्र सावंत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याचे अनावरण व डॉ.दीपक सावंत लिखित “गुलदस्ता” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवजीवन संस्थेचे सरचिटणीस डॉ दीपक सावंत, संस्थेचे अध्यक्ष ऍड दीपक साळवी, माजी आमदार श्याम सावंत, अशोक पाटील, अनिला सावंत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार आहे. म्हाडा एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. भांडुप आणि परिसरातील पुनर्विकासाचे प्रकल्प, रस्ते, नालेसफाई तसेच सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच या भागातील नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु  करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. विक्रोळी येथे 500 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “स्व. प्राचार्य सावंत यांनी लावलेल्या नवजीवन संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असेच आहे. शिक्षण हे आपल्या परिवर्तनाचे प्रमुख साधन असून प्रत्येकाने आपली क्षमता, कुवत ताकद ओळखून कार्य करावे. प्रत्येक जण कर्माने मोठा असतो तेव्हा प्रत्येकाने चांगले कर्म करण्यावर भर द्यावा”.

    डॉ. दीपक सावंत यांनी कोरोना काळात विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले स्तंभलेखन पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.  डॉ. सावंत यांचे राज्याच्या कुपोषण निर्मूलनातील योगदान उल्लेखनीय आहे. हे लक्षत घेऊन त्यांची राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

    डॉ. दीपक सावंत यांनी प्रास्ताविकामध्ये दिवंगत रामचंद्र सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

    00000

    मनीषा पिंगळे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *