• Mon. Nov 25th, 2024

    जी-२० च्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाला एक लाख विद्यार्थ्यांची भेट

    ByMH LIVE NEWS

    Jun 20, 2023
    जी-२० च्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाला एक लाख विद्यार्थ्यांची भेट

    पुणे, दि.20 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचा परिसर विद्यार्थ्यांनी जणू फुलून गेला होता…मोठ्या उत्सुकतेने भव्य मंडपात प्रवेश करणारे विद्यार्थ्यांचे चेहरे आत जाताच खुलत होते. खेळणी, इलेक्ट्रॉनिक साधने, उपकरणे, विविध खेळ, व्यायामासोबत ज्ञान, हस्तकला, विविध अभ्यासक्रम आणि कौशल्याची माहिती घेताना होणारा आनंद…आणि रोबोटसोबत मज्जा आणि ड्रोनची करामत… शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देताना जणू शालेय विद्यार्थ्यांनी मुक्त शाळेतील मनसोक्त आनंदाचा अनुभव घेतला.

    ‘जी-20’ च्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी भेट देऊन माहिती घेतली. शहरातील शाळांमधील विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी शिक्षक आणि पालकांसोबत येत आहेत. त्यांना सुलभतेने माहिती घेता यावी यासाठी विद्यापीठातर्फे चांगले नियोजनही करण्यात आले आहे.

    प्रदर्शनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,  आयआयटी मुंबई, मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, एनसीईआरटी, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट, सिम्बायोसिस, राष्ट्रीय बालभवन अशा संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणाच्या संधीविषयी माहिती देण्यात येत आहे. एनसीईआरटीने विविध कौशल्याची माहिती पुस्तके, खेळणी आणि प्रतिरुपांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

    विज्ञान, तंत्रज्ञान, ई-लर्निंग, रोबोटिक्स, विज्डम वॉल, फोटो मेमरी, विज्ञानाधारीत मॉडेल्स अशा नाविन्यपूर्ण विषयांची माहिती मिळत असल्याने विद्यार्थी उत्साहाने प्रदर्शनाला भेट देत आहेत. काही विद्यार्थी माहितीवर आधारीत टिपणे घेतानाही पहायला मिळत होते. उत्तराखंड, मिझोरम, आसाम अशा दालनात प्रदर्शित त्या-त्या राज्याच्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही घेत आहेत.

    हस्तकला कौशल्य जाणून घेण्याची संधी, अभिनव शैक्षणिक साहित्य, मोबाईलपेक्षाही अधिक आनंद देणारे शैक्षणिक खेळ, सोबत सेल्फी पॉईंट, जी-20 लोगोसोबत प्रदर्शनाची आठवण म्हणून ग्रुप फोटो, उपकरणे हाताळताना ज्ञानाच्या बाबतीत मित्रांशी गमतीदार स्पर्धा यासोबतच विविध उपकरणे हाताळण्याचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळत आहे. सोबत आवडते कॉमिक्सही भेट मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अधिकच उत्साह जाणवतो.

    एवढे मोठे शैक्षणिक प्रदर्शन प्रथमच पहात असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यांच्यात दडलेल्या क्षमतेला आणि उत्तमतेला चालना देणारे जग जणू त्यांच्यासमोर उभे राहिल्याचा आनंद या प्रतिक्रियांमधून समोर आला. नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेणारे विद्यार्थी हस्तकलेविषयी तेवढ्याच उत्सुकतेने विविध राज्याच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारत होते. एकूणच या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिक्षणाचे विस्तारलेले विश्व पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना  जी-20 च्या निमित्ताने मिळाली. 22 जूनपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

    साईराज कागणे, विद्यार्थी- हस्तकला, घरी बनविलेल्या वस्तू, सायकलींग, विविध कलाप्रकार प्रदर्शनात पहायला मिळतात. प्रदर्शनाला भेट देऊन खूप छान वाटते.

    मयुरी मस्करे – ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कुल – या प्रदशर्नातून खूप माहिती मिळाली. भविष्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त् ठरेल. अनेक नव्या गोष्टी समजावून घेतांना मजा आली. आयोजनही खूप छान आहे.

    राम मुळे, एसनबीपी स्कुल पुणे –नागालँडची खेळणी आणि उत्तराखंडची बांबूकला खूप आवडली, कॉमिक्सही भेट मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला. हस्तकला प्रकार खूपच सुंदर आहेत. कला आणि तंत्रज्ञानाचा छान संगम आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *