• Sat. Sep 21st, 2024

जेनेरिक औषधांबाबत खळबळजनक दावा; ‘या’ आजारांवर डोस वाढवूनही फायदा नाही

जेनेरिक औषधांबाबत खळबळजनक दावा; ‘या’ आजारांवर डोस वाढवूनही फायदा नाही

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : फुफ्फुसांच्या काही गंभीर आजारामध्ये जेनेरिक औषधे कमी प्रभावी आढळून आली, असा दावा अभ्यासातून समोर आला आहे. चंडीगढ येथील ‘पीजीआय’ संस्थेमध्ये झालेला अभ्यास ‘मायकोसेस जर्नल’ या पाक्षिकात अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.‘क्रोनिक पल्मोनरी ॲस्परगिलोसिस’ या फुफ्फुसांच्या गंभीर विकाराच्या संदर्भात हा अभ्यास करण्यात आला आहे. यात अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी ९४ प्रकारच्या जेनेरिक औषधांचा; तर पेटंट घेतलेल्या ९९ इनोव्हेटर औषधांचा वापर केला. यात १९३ रुग्णांपैकी ४८ टक्के रुग्णांना जेनेरिक औषधे देण्यात आली व ५१.३ टक्के रुग्णांना इनोव्हेटर औषधे देण्यात आली. उपचारांच्या दोन आठवड्यांनी इनोव्हेटर औषधे दिलेल्या ७३ टक्के रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आली, तर जेनेरिक औषधे दिलेल्या केवळ २९ टक्के रुग्णांनी प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे जेनेरिक औषधांचा डोस वाढवूनही रुग्णांवर फारसा परिणाम दिसून आला नाही, असेही या संदर्भातील अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जुनाट व गंभीर आजारांमध्ये जेनेरिक औषधे कमी प्रभावी असल्याचा निष्कर्षही या अभ्यासात काढण्यात आला आहे.

दरम्यान, जेनेरिक औषधांच्या एकूण प्रभावाविषयी शहरातील फिजिशियन डॉ. विकास रत्नपारखे म्हणाले, ‘विविध अँटिडायबेटिक म्हणजेच मधुमेहविरोधी जेनेरिक औषधांमध्ये अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याचे अनेक रुग्णांच्या अनुभवावरून पाहायला मिळाले आहे. अर्थात, अपेक्षित परिणाम साधला जात असेल, तर जेनेरिक औषधे घेण्यास डॉक्टरांचा विरोध असण्याचे काही एक कारण नाही. त्यामुळे ज्यांना अपेक्षित परिणाम जाणवतो, त्यांनी ही औषधे घ्यायला काहीच हरकत नाही.’
पवईकरांसाठी गुड न्यूज! मुंबई महापालिकेडून खास प्लॅनिंग, ९ कोटी खर्च करणार
उपयोग होत असल्याचे निरीक्षण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वार्धक्यशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. मंगला बोरकर म्हणाल्या, ‘शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी औषधे उपलब्ध असतातच, पण कधी उपलब्ध नसल्यास गरीब रुग्णांना जेनेरिक औषधे सुचवली जातात. अशा बहुतांश वेळी रुग्णांना जेनेरिक औषधांचा लाभ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जेनेरिक औषधांचाही उपयोग होतोच.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed